वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार मतदारयादी पुनर्सर्वेक्षण वादाने नवे वळण घेतले आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजय कुमार सिन्हा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा राजद नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. तसेच बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांचे नाव बांकीपूर आणि लखीसराय अशा दोन ठिकाणी मतदारयादीत असल्याचा दावा केला आहे. रविवारी या प्रकरणात विजय सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतून नाव काढून टाकण्याच्या अर्जाशी संबंधित कागदपत्रेही माध्यमांसोबत शेअर केली. मतदारयादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती प्रक्रियेबद्दल तेजस्वी यादव यांच्याकडे माहिती नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
सुरुवातीला माझ्या संपूर्ण कुटुंबाचे नाव पाटण्यात नोंदणीकृत होते. एप्रिल 2024 मध्ये मी लखीसराय विधानसभेत माझे नाव जोडण्यासाठी अर्ज केला होता. तेथून माझे नाव काढून टाकण्यासाठी मी फॉर्मही भरला होता. माझ्याकडे पुरावे आहेत. काही कारणास्तव माझे नाव काढून टाकण्यात आले नाही, म्हणून मी बीएलओला फोन करून लेखी अर्ज दिला आणि पावती घेतली. माझ्याकडे दोन्ही कागदपत्रे आहेत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. मी फक्त एकाच ठिकाणाहून मतदान करतो. गेल्या वेळीही मी लखीसराय येथून मतदान केले होते आणि यावेळीही मी तेथून फॉर्म भरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









