आयुर्वेदिक डॉक्टर अलोपेथिक डॉक्टरांप्रमाणे समान काम करत नसल्यामुळे ते समान वेतनाचा दावा करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. गुजरातमधील सरकारी आयुर्वेद डॉक्टरांनी एमबीबीएस (बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी) यांच्या बरोबर आपल्यालाही वेतन मिळावे यासाठी वेतन समानतेसाठी केलेले अपील फेटाळून लावले आहेत. बीएएमएस ही पदवी असलेल्या पदवीधारक डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टरांच्या बरोबरीने वागवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध गुजरात सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
या दोन विषयांमधील फरक लक्षात घेऊन न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, “आयुर्वेदिक डॉक्टरांचे महत्त्व आणि स्वदेशी वैद्यक पद्धतींना चालना देण्याची गरज आहे. तरी हे दोन्ही डॉक्टर्स समान वेतन मिळण्यासाठी नक्कीच समान काम करत नाहीत. या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.” असा युक्तीवाद केला आहे.
खंडपीठाने म्हटले की, “आम्हाला यात शंका नाही की, प्रत्येक वैद्यक पद्धतीला इतिहासात आपले स्थान आहे. पण आज, स्वदेशी औषध पद्धतीचे अभ्यासक क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्य़ा शस्त्रक्रिया करत नाहीत. आयुर्वेदामध्ये या शस्त्रक्रिया करता येत नाहीत.”
बॅचलर ऑफ मेडिसीन अँड सर्जरी (बीएएमएस) या आयुर्वेदातील पदवीधर असलेल्या डॉक्टरांना राज्यातील एमबीबीएस डॉक्टरांच्या बरोबरीने वाढीव वेतनाचा लाभ देण्याचे गुजरात उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर या निर्णयाविरुद्ध गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.









