विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : न्याय देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोलकाता येथील आर. जी. कार या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरून देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) संपाची हाक देण्यात आली होती. यावरून शनिवारी विविध डॉक्टर संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणावरून सरकारी डॉक्टर संघटनांसह खासगी डॉक्टर संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. देशामध्ये महिलांवर अत्याचार करून हत्या करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, महिला डॉक्टरवर झालेला हा अन्याय अक्षम्य अपराध आहे. याविरोधात सरकारने कडक भूमिका घेऊन भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कायदे अंमलात आणले पाहिजेत. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. डॉक्टरला देव मानले जाते, मात्र दुसरीकडे अशाप्रकारे केले जाणारे अन्याय निमूटपणे सहन केले जात आहेत. सरकारने अशा घटनांची तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे अंमलात आणावेत.
समाजसेवा करणाऱ्या व रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने असे कृत्य करणाऱ्यांचे फावले आहे. पीडित महिला डॉक्टराच्या कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. या घटनेची तत्काळ सुनावणी करून न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी धोरणात बदल करून कडक कायदे लागू करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
आयुष फेडरेशन ऑफ इंडियाकडून या घटनेचा निषेध नोंदवून हत्या झालेल्या डॉ. मोमीता हिच्या कुटुंबीयाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पद्मराज पाटील, उपाध्यक्ष सुरेश चौगुला, सचिव प्रवीण दोण्याण्णावर, विनोद पट्टण, डॉ. आदेश्वरी गनी याबरोबरच इंडियन डेंटल असोसिएशनकडूनही या घटनेचा निषेध नोंदवून आरोग्य सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, पीडित कुटुंबीयाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नवीन दोडवाड, डॉ. जगदीश कदम्मण्णा, डॉ. राधाकृष्ण हरवाडेकर, डॉ. सचिन शिवनालकर, डॉ. समीर पोटे, डॉ. अश्विनी अंगडी आदी उपस्थित होते.
यावेळी विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आंदोलन केले. सरदार्स मैदान ते चन्नम्मा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.









