कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निषेध
बेळगाव : राज्यामध्ये निवासी (पीजी) डॉक्टरांकडून सोमवारपासून स्टायफंड वाढीसाठी राज्यभरात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बिम्स आवारातील डॉक्टरांनी बिम्स प्रशासनाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करून मागण्यांच्या पूर्ततेची मागणी केली. दरम्यान, पश्चिम बंगाल येथील डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. राज्यामध्ये निवासी डॉक्टरांकडून सोमवारपासून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. स्टायफंड वाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे. राज्यातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये अत्यंत कमी स्टायफंड देण्यात येत आहे. ही तफावत दूर करण्यात यावी, स्टायफंड वाढ त्वरित करावी या मागणीसाठी पीजी डॉक्टर व इंटर्न डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत.
बिम्स आवारातील जवळपास 90 पेक्षा अधिक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारपासून दंडाला काळी फीत बांधून डॉक्टरांनी बेंगळूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मंगळवारी बिम्स प्रशासनाच्या प्रवेशद्वारात न्यायासाठी आंदोलनात करण्यात आले. मागण्यांची त्वरित पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेचा बिम्समधील पीजी डॉक्टरांकडून निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.









