प्रतिनिधी / बेळगाव
धारवाडचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. राजन देशपांडे यांना राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस कर्नाटक यांच्यातर्फे डॉक्टरेट पदवी देण्यात आली. बेंगळूर येथे झालेल्या 24 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ही पदवी देण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर व कुलगुरू डॉ. एम. के. रमेश उपस्थित होते.
डॉ. राजन हे गेल्या चार दशकांपासून बालरुग्ण सेवेत कार्यरत आहेत. कुपोषित मुलांच्या समस्या, लसीकरण आणि नवजात शिशुंची काळजी या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. पल्स पोलिओ उपक्रमात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. पोलिओ लसीचे निर्माते सर जोनास साल्क यांच्या बरोबर चर्चा करण्याचाही मान त्यांना मिळाला. रोटरी, आयएमए, एफपीएआय या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.
गिफ्ट ऑफ लाईफ अंतर्गत त्यांनी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिर घेतले. ज्याचा 1 हजार मुलांना लाभ झाला आहे. धारवाडच्या चिल्ड्रन अकॅडमीचे ते संस्थापक असून त्या अंतर्गतही ते मुलांसाठी विविध कार्यक्रम राबवितात. सध्या कर्नाटक अकॅडमी ऑफ पिडीऍट्रिक्सचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.









