मिरज :
तालुक्यातील खंडेराजुरी येथे जनावरांचे डॉक्टर असलेल्या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे. शुभम प्रकाश कोष्टी असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू – शकले नाही. याबाबत ग्रामीण – पोलिसात नोंद आहे.
दरम्यान, शुभम याने खासगी – सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधीत खासगी सावकारांचा ग्रामीण पोलिस बचाव करीत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.
डॉ. शुभम कोष्टी याने आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात शुक्रवारी २८ मार्च रोजी रात्री आठ वाजता औषध पिऊन आत्महत्त्या केली. त्याच्या मृतदेहावर शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतर ग्रामीण पोलिसांनी औषध पिऊन आत्महत्त्या, अशी नोंद केली आहे. तसेच घटनास्थळी विषारी औषधांच्या दोन बॉटलही सापडल्या आहेत. सदर तरुणाने आत्महत्त्या का केली, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शुभम कोष्टी याने गावातीलच खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्त्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे. पोलिस अधिक्षकांना लेखी निवेदन दिले असून, त्यामध्ये खासगी सावकारांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. शुभम कोष्टीने सावकारांकडून काही रक्कम दहा टक्के व्याज दराने घेतली होती. व्याजासह मुद्दल परतफेड करुनही पैशांसाठी तगादा लावला जात होता. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळूनच शुभमने आत्महत्त्या केल्याचा संशय जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे, तसेच तपास अधिकाऱ्यावरही नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून, खासगी सावकार आणि तपास अधिकारी पोलिस हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने आरोपींना प्रकरणातून वाचविले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.








