इस्रो प्रमुख सोमनाथ यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्वत:चा विश्वसनीय ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकावर स्पॅडेक्स नावाच्या स्पेस डॉकिंग प्रयोगाच्या प्रदर्शनासाठी मिशनची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. रॉकेट तयार होत असून वैज्ञानिक चालू महिन्याच्या अखेरपर्यंत याच्या प्रक्षेपणाची अपेक्षा करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. स्पेस डॉकिंगचे तंत्रज्ञान काही मोजक्या देशांनीच विकसित केले आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच हे साध्य झाले आहे.
डिसेंबर महिन्यात पीएसएलव्ही-सी60 चे प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण स्पेस डॉकिंग प्रयोगाचे प्रदर्शन करणार असून याला ‘स्पॅडेक्स’ नाव देण्यात आले आहे. रॉकेट सध्या तयार केला जात असून आम्ही प्रक्षेपणाशी संबंधित अंतिम टप्प्याच्या हालचालींची तयारी करत आहोत, जी चालू महिन्यातच पूर्ण होऊ शकते असे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
अंतराळ स्थानकाच्या संचालनासाठी महत्त्वपूर्ण
स्पेस डॉकिंग अंतराळात दोन अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान आहे. याच्या मदतीने मानवाला एका अंतराळयानातून दुसऱ्या अंतराळ यानात पाठविणे शक्य होते. स्पेस डॉकिंग हे अंतराळ स्थानकाच्या संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डॉकिंगमध्ये अंतराळ यानच आपणहून अंतराळस्थानकाशी जोडले जाऊ शकते. अंतराळात दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याच हे तंत्रज्ञानच भारताला स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणे आणि चांद्रयान-4 प्रकल्पात मदत करणार आहे.
मोहिमेसमोरील आव्हाने
इस्रोच्या स्पेस डॉकिंग मिशनमध्ये अनेक आव्हाने आहेत. सर्वात मोठे आव्हान 2 उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत मिलिमीटर-स्तराच्या अचूकतेसोबत जोडणे आहे. याचबरोबर दोन्ही उपग्रहांदरम्यान संचार आणि नेव्हिगेशन डाटाचे आदान-प्रदान सुरळीतपणे होत रहावे लागणार आहे. ऑटोमॅटिक डॉकिंगसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची देखील आवश्यकता भासणार आहे.









