बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे आवाहन
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने दूरवर उभी करून पायी चालत बाजारपेठेत यावे, असे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे. बाजारपेठेतील नागरिक व वाहनांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच नागरी पोलीसही जुंपण्यात आले आहेत. कार, ऑटोरिक्षा, दुचाकींमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. खासकरून गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली परिसरात शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस उपायुक्तांनी नागरिकांना आपली वाहने दूरवर पार्क करून बाजारपेठेत पायी चालत येण्याचे आवाहन केले आहे. उत्सवाच्या खरेदीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशभक्तांची मोठी गर्दी बाजारपेठेत होत आहे. म्हणून शनिवारी सायंकाळपासून ऑटोरिक्षाही बाजारपेठेत सोडण्यात आल्या नाहीत. पुढील दोन दिवस मुख्य बाजारपेठेत गर्दीच्यावेळी ऑटोरिक्षांनाही प्रवेश असणार नाही. खरेदीसाठी कार, दुचाकी व इतर वाहनांतून येणाऱ्या नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौक किंवा इतर ठिकाणी आपली वाहने उभी करून पायी चालत बाजारपेठेत यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे.









