नगर विकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केल्या अभियंत्यांना सूचना
बेळगाव : बेळगाव तालुक्यात कामांचा ढीग आहे. मात्र अधिकारी आपली जबाबदारी झटकण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे यापुढे असे न करता आपली जबाबदारी योग्यरित्या पार पडावी, अशा सूचना नगर विकास खात्याचे योजना अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी बैठकीत केल्या आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली. शहरात अस्वच्छतेची समस्या वारंवार भेडसावत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच पाऊल उचलण्याची गरज आहे. सध्या बेळगाव तालुक्यात दोन नगरपंचायती आहेत. मात्र त्याठिकाणी अस्वच्छता अधिक आहे. याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नयेत व स्वच्छता राखण्यासाठी विशेष पाऊल उचला, असे आवाहनही त्यांनी केले.
बेळगाव जिल्ह्यात नगरपंचायती, नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. नगरपंचायत किंवा नगरपालिकांमध्ये कचऱ्याची समस्या आवासून उभी आहे. ती सोडविण्यासाठी अभियंत्यांनी कोणत्या उपाययोजना राबविल्या आहेत, याची माहिती सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मात्र अनेकांकडून योग्य उत्तरे आली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी बेकायदेशीर कामे किंवा अतिक्रमण झाल्यास त्यांचा अहवाल तातडीने सादर करावा, असेही ते म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातील नगरपंचायती व नगरपालिकांबाबत आता गांभीर्य घ्या. जी विकासकामे राबवायची असतील त्यांची माहिती तातडीने द्या व तसा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले. याचबरोबर कोणत्याही योजना अर्धवट राहू नयेत, त्या गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









