धारबांदोड्यात पाणलोटच्या विविध उपक्रमाचे आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते उद्घाटन
धारबांदोडा : गोवा कृषी संचलनालयामार्फत धारबांदोडा तालुका विभागीय कृषी कार्यालयाच्या प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीतर्फे पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत धारबांदोडा तालुक्यातील पाणलोटातील विविध एन्ट्री पॉईट उपक्रमाचे उद्घाटन व वितरण आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कळसई येथील श्री सातेरी पिसानी मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 हा अंत्यत चांगला उपक्रम असून आपण दुर्लक्षित केलेली शेती, पुर्वीच्या विहीरी, तळी व नैसर्गिक स्रोत पुर्नजिवीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील दावकोण, मरड, धुलैय व थातोडी या गावांचा समावेश आहे. पुढील तीन वर्षात सुमारे दहा कोटी रूपये या उपक्रमात खर्च केले जाणार आहेत. जे उपक्रम व प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात सर्वाचा सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने काम करून पैशाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. पुर्वीच्या पारंपारिक शेती, व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे असे आमदार गणेश गावकर यावेळी म्हणाले. सरकारने तयार केलेल्या प्रत्येक योजनांचा लाभ जनतेला व्हावा यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा पुरेपुर लाभ जनतेने घ्यावा, तसेच या उपक्रमात समावेश असलेले गाव समृद्ध होईल अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कृषी खात्याचे उपसंचालक तथा प्रकल्प अधिकारी राजेंद्र देसाई, धारबांदोडा विभागीय कृषी अधिकारी संतोष गावकर, किर्लपाल दाभाळ पंचायतीचे सरपंच श्रीमती रूक्मिणी गावकर, उपसरपंच कालिदास गावकर, पंचसदस्य राजेंद्र वेळीप, कल्पेश गावकर, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, पंचसदस्य महेश नाईक, दामोदर नाईक, किर्लपाल दाभाळ पाणलोट संघटनेचे अध्यक्ष मोहन गावकर, दावकोण-धुलैय पाणलोट संघटनेचे अध्यक्ष गुरू गावकर उपस्थित होते. पाणलोट विकास उपक्रमाची जागृती जनतेमध्ये व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा व फोंडा या पाच तालुक्याचा समावेश या उपक्रमात झालेला आहे. पाचही तालुक्यामध्ये उपक्रमाची कामे सुरू झाली आहेत. या उपक्रमात ज्या गावांचा समावेश होऊ शकतात त्याच गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणी यात राजकारण आणू नये अशी विनंती राजेंद्र देसाई यांनी आपल्या स्वागतपर भाषणात केली. कार्यक्रमाची सुरूवात होण्यापुर्वी वाघोण येथील श्री सातेरी स्वरांजली गटातर्फे या उपक्रमावर आधारित सुंदर असे पथनाट्या सादर करण्यात आले. यावेळी आमदारांच्या हस्ते भाजीणी बियाणे, दोन हायस्कूलाना सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट लावण्याची यंत्रे, सौर उर्जेवर चालणाऱ्या पंचवीस वीजयंत्रणा सुपुर्द करण्यात आले. तसेच पथनाट्या सादर पेलेल्या श्री सातेरी स्वरांजली गटाला संगीत वाद्याचे साहित्य प्रदान करण्यात आले.









