राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर रिजीजू यांचा पलटवार, गांधींची उडविली खिल्ली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘मिस इंडिया’ आणि तत्सम सौंदर्य स्पर्धांमध्ये दलित, मागासवर्गिय आणि आदिवासी महिलांना प्रतिनिधित्व मिळत नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. आपण मिस इंडिया स्पर्धा जिंकलेल्यांची सूची पाहिली. मात्र, त्या एकही नाव दलित, अन्य मागासवर्गिय आणि आदिवासी महिलेचे दिसत नाही, अशी टिप्पणी त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या त्यांच्या विधानावर जोरदार टीका होत असून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी गांधी यांच्या या विधानाची खिल्ली उडविली आहे. तसेच हे विधान धादांत खोटे आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सप्रमाण दाखविले.
राहुल गांधी यांच्या या विधानावर त्यांचे बरेच ट्रोलिंग सोशल मिडियावर होत आहे. किरण रिजीजू यांनीही खोचक टिप्पणी केली आहे. मिस इंडिया आदी स्पर्धांशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसतो हे राहुल गांधींना माहीत नाही काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, याही क्षेत्रात राहुल गांधी यांना आरक्षण हवे आहे काय, अशीही पृच्छा त्यांनी केली आहे. गांधी यांनी नीट माहिती घेऊन मग विधाने करावीत. अन्यथा त्यांचेच हसे होते, असे इतरही अनेकांनी स्पष्ट केले आहे. सोशल मिडियावर गांधी यांच्या या विधानावर बरीच मीम्स येत आहेत.
विधान पूर्णत: खोटे?
दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गिय महिलांना सौंदर्य स्पर्धांमध्ये संधी मिळत नाही आणि त्या अशा स्पर्धा जिंकू शकत नाहीत, हे विधान धादांत खोटे आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी केली आहे. राहुल गांधी माहिती न घेताच वाटेल ते आरोप करतात. त्यांनी आपले सामान्य ज्ञान वाढवावे, असे खोचक आवाहन अमित मालवीय यांनी केले आहे.
रिया एक्काचे काय?
दोनच वर्षांपूर्वी, अर्थात 2022 मध्ये झारखंडची आदिवासी युवती रिया एक्का हिने ‘मिस इंडिया’ स्पर्धा जिंकली होती. ही माहिती राहुल गांधी यांना नाही का, असा प्रश्नही विचारला जात आहे. शिवाय, देशात सौंदर्य स्पर्धा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून भरविल्या जात नाहीत. त्या अन्य किंवा खासगी संस्थांकडून भरविल्या जातात, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हिंदूंच्या भावनांशी खेळ
राहुल गांधी यांनी आपल्या मतपेटीला खूष करण्यासाठी सरळसरळ हिंदूंच्या भावनांशी खेळ चालविला आहे. हिंदू समाजाला जातींच्या आधारावर फोडण्यासाठी आणि त्याद्वारे आपला सत्तास्वार्थ साधण्यासाठी ते बेभान होऊन प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच त्यांना असे आरोप सुचतात, अशीही टीका त्यांच्यावर होत आहे.









