मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचे विविध विभाग प्रमुखांना निर्देश : हेलपाटे घालायला लावू नका
मडगाव : मडगाव पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या लोकांना हेलपाटे घालावे लागू नयेत याची काळजी घेताना वेळेत कामे करून देण्याचे निर्देश नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष शिरोडकर यांनी प्रशासकीय अधिकारी अभय राणे यांना घेऊन प्रशासकीय, कर, सेनिटरी, लेखा विभागांना भेटी दिल्या. यावेळी उपनगराध्यक्षा दिपाली सावळ उपस्थित होत्या. नगराध्यक्ष शिरोडकर यांनी विभाग प्रमुखांकडून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागासाठी एक संगणक तसेच लेखा विभागात एक खराब झालेला प्रिंटर बदलून त्वरित नवीन खरेदी करण्यासाठी स्टोअर किपरला निर्देश देण्यात आले. कर विभागात व्यापार व अन्य परवाने मिळविण्यासाठी येणाऱ्या लोकांना जास्त समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे नगराध्यक्षांनी या विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले.
कोणताही शेरा फाईलवर टाकण्याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत जाणून घ्यावे. त्वरित तोडगा काढून फायली हातावेगळ्या कराव्यात. फायली पडून राहिल्यास पालिकेचा महसूल बुडत असतो याचे भान ठेवावे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. प्रशासकीय अधिकारी राणे यांना त्यांनी प्रक्रिया सुटसुटीत करून लोकांना दिलासा देण्यास सांगितले. जन्म व मृत्यूच्या दाखल्यांसंबंधीच्या फायलींचा मोठा गठ्ठा पालिकेच्या पॅसेजमध्ये पडून आहे. त्यावर उपाय काढून त्या फायली सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांकडे बोलून दाखविली. काही कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्याचे तसेच कामाच्या वेळेत कार्यालयाबाहेर पडत असल्याचे दिसून आल्याने नगराध्यक्ष शिरोडकर यांनी यापुढे कामानिमित्त कार्यालयाबाहेर जाणे भाग पडल्यास ‘मूव्हमेंट रजिस्टर’वर त्याची नोंद करावी, असे निर्देश दिले आहेत.
गणवेष परिधान न करणाऱ्यांचा भत्ता रोखून धरण्याचा निर्देश
कित्येक पालिका कर्मचारी आणि अधिकारी गणवेष शिलाई तसेच तो धुण्यासाठी भत्ता घेत असले, तरी गणवेष परिधान करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी टिपणी टाकली असून मुख्याधिकाऱ्यांना यापुढे विनागणवेष आढळणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या भत्त्याची रक्कम रोखून धरण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, कामचुकारांवर लक्ष ठेवण्यासाठी बंद असलेला यांत्रिकी हजेरीपट कार्यान्वित करून तो सक्तीचा करण्याची मागणी काही नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.