वृत्तसंस्था / पाटणा
मुख्यमंत्री नितीश कुमार हे 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नसतील. यासंबंधीची घोषणा नितीश यांनीच केली आहे. पाटण्यातील महाआघाडीच्या आमदारांच्या बैठकीत नितीश यांनी 2025 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचे म्हटले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचे माझे लक्ष्य आहे. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची माझी इच्छा नसल्याचे विधान नितीश यांनी केले आहे.
विधानसभा अधिवेशनातील कामकाजानंतर आमदारांची बैठक झाली. यात नितीश कुमारांनी आपल्यानंतर तेजस्वी यादव यांचे नेतृत्व असेल असे स्पष्ट केल्याची माहिती अर्थमंत्री आणि संजद नेते विजय चौधरी यांनी दिली आहे.









