म्हापसा येथे पत्रकार परिषदेत सरकारवर टीका : पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर भर
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात खाणी सुरु होणार असे सरकारने स्पष्ट केले असले तरी यासाठी सर्व प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्या प्रक्रिया पूर्ण करण्यास चार – पाच वर्षांचा कालावधी लागेल. खाणी सुरु होणार असे सांगून जनतेच्या डोळ्य़ात धूळफेक करु नये. भाजप निवडणुकीपूर्वी व नंतर सुद्धा खोटीच आश्वासने देत आहे. यापासून जनतेने सावध राहावे. आम्ही काँग्रेसचे केवळ तीन आमदार शिल्लक असलो तरी सर्व फुटीरांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी माहिती हळदोणचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हापसा येथे उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी काँग्रेस नेते विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, प्रणव परब, ज्ञानेश्वर गोवेकर, अतुल नाईक, विवेक डिसिल्वा, मिताली गडेकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, या पुढे आम्ही तिघे काँग्रेसचे आमदार मिळून राज्यातील समस्या लोकांसमारे ठेवणार आहोत. याद्वारे भाजपची खोटी आश्वासनांचा पर्दापाश करुन त्यांना उघडे पाडणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या फुटीर आमदारांना जनताच धडा शिकविणार आहे. फुटणार नाही अशी देवासमोर शपथा घेऊनही ते फुटले. आता तो विचार न करता काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व प्रक्रिया करुन खाणी सुरु करणे बंधनकारक
सरकार चार खाणींचा लिलाव करणार असल्याचे वृत्तपत्रातून वाचले आहे मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार खाणी सुरु करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याला वेळ लागणार आहे. आमचा खाणींना विरोध नाही मात्र त्या पुन्हा कायद्याच्या कचाटय़ात अडकू नये. जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. आपण विधानसभेत सरकारला खाणींचा लिलाव न करता चालविण्याचा सल्ला दिला होता. खाणींचा लिलाव केल्यास कंपन्या आपले कर्मचारी नियुक्त करणार त्याचा राज्यातील जनतेला काय फायदा होईल, आमदार कार्लुस आल्वारीस म्हणाले.