डीएसईएलचा इशारा : मुलींना 50 टक्के आरक्षण
बेळगाव : खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांच्या मुलाखती घेण्याचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार राईट टू एज्युकेशन अॅक्टनुसार गुन्हा असून कोणत्याही शाळेने विद्यार्थी अथवा पालकांच्या मुलाखती घेऊन प्रवेश देऊ नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अॅण्ड लिटरसी विभागाने दिला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बऱ्याच नामांकित खासगी शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांच्या परीक्षा, तसेच मुलाखती घेत आहेत. बेळगाव परिसरातही अशाच प्रकारे काही शाळा मुलाखती घेत असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना घरची परिस्थिती व इतर बाबी जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, तसेच पालकांची मुलाखत घेण्याचा प्रकार नव्याने सुरू झाला आहे. याला आता शिक्षण विभागाने आक्षेप घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. एखादा विद्यार्थी मुलाखत अथवा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येतो. तसेच पालक उच्चशिक्षित नसतील तरीदेखील काही शाळा प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे डीएसईएल विभागाने कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
प्रवेशासाठी मुलींना आरक्षण
राज्यातील खासगी, तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी मुलींना 50 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. कोणत्याही शाळेने प्रथमत: विद्यार्थिनींना प्रवेश द्यावा, त्यानंतरच विद्यार्थ्यांचा विचार करावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही मुलीला शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही.









