नाव ही आपली सर्वम्ओळख असते, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. कोणीही आपले लक्ष वेधून घ्यायचे असेल तर आपल्याला नावानेच हाक मारतो. कारण आपली ओळख सिद्ध करण्याचा किंवा अन्य लोकांना तिचा उपयोग करु देण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असतो. तथापि, आपल्या भारताच्याच मेघालय या ईशान्येकडील राज्यात कांगथान नावाचे गाव आहे. तेथील लोक एकमेकांना नावाने ओळखत नाहीत. तेथे आपल्या ओळखीच्या व्यक्तीला बोलवायचे असेल तर त्याचे नाव घेऊन नव्हे, तर शिट्टी वाजवून त्याचे लक्ष वेधले जाते.
या गावाला म्हणूनच ‘व्हिसलिंग व्हिलेज’ म्हणूनही ओळखले जाते. या गावातील लोकांना नावे नसतातच अशातला भाग नाही. प्रत्येकाला त्याचे अधिकृत नाव त्याच्या जन्मनंतर ठेवलेच जाते. तथापि, येथील प्रथा अशी आहे, की कोणालाही त्याचे नाव घेऊन बोलवायचे नाही. त्याच्या नावाचा उल्लेखही करायचा नाही. त्यामुळे येथे नाव ठेवण्यावर नव्हे, तर नाव घेण्यावर जणू काही बंदींच आहे. या गावात अशी प्रथा का पडली, याचे एक कारणही आहे. हे गाव डोंगर दऱ्यांनी वेढलेले आहे. सपाट जागा कमी आहे. त्यामुळे जोरात हाका मारल्या तरी त्या ऐकू जाण्याची समस्या असते. त्यामुळे येथील लोकांनी शिट्या वाजवून एकमेकांना बोलाविण्याची एक पद्धती अनेक शतकांपासून विकसीत केली आहे. शिट्टी किंवा शीळ ही सहजपणे घालता येते आणि ती दूरवर ऐकू जाते. परिणामी कमी श्रमांमध्ये आपल्याला संदेशवहन करता येते. ही शीळ घालताना वेगवेगळ्या धून वाजविल्या जातात. मूल जन्माला आले की त्याच्या नावाने एक स्वतंत्र धून बनविली जाते आणि ती शिट्टीवर वाजविली जाते. अशा प्रकारे हे गाव या त्याच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे देशभरात प्रसिद्धीस पावलेले आहे.









