उंडीर येथील सभेत मनोज परब यांचे आवाहन : गावाच्या पाठिशी आरजीची फौज उभी कऊ
फोंडा : उंडीर गावात होऊ घातलेल्या 20 एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पामागे विकासाची लक्षणे कमीच दिसतात. उलट भविष्यात गावांवर होऊ घातलेल्या विनाशाचे संकेतच मिळतात. असे प्रकल्प उभारताना सरकार अद्ययावत तंत्रज्ञानाच्या कितीही बात मारत असले तरी, लोकवस्तीजवळ उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया व मलनिस्सारण प्रकल्पाचे परिणाम आज खुद्द स्मार्ट सिटी पणजीमध्ये दिसत आहेत. गावातील पर्यावरणाचा बळी देऊन अशा प्रकल्पांना गावांत मुळीत थारा देऊ नका. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ संघटीतपणे उभे राहिल्यास संपूर्ण गोव्यातून रिव्होल्युशनरीची फौज उभी करण्याचे आवाहन आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केले.
बांदोडा पंचायत क्षेत्रातील उंडीर गावांत होऊ घातलेल्या नियोजित मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला असून या पार्श्वभूमिवर रविवारी सायंकाळी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत मनोज परब बोलत होते. येथील श्री म्हाऊ रामपंचायतन देवस्थानच्या सभागृहात झालेल्या या सभेला रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर, पदाधिकारी विश्वेश नाईक, प्रेमानंद गावडे, शैलेश नाईक, देवस्थान समितीचे अध्यक्ष मुकुंद नाईक, सदानंद नाईक व तुळशीदास नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. उंडीर गावासाठी एक ते दोन एमएलडी प्रकल्प पुरेसा आहे. पण 34 हजार चौ. मिटर जागेत व 20 एमएलडी प्रकल्प उभारण्यामागे स्थानिक आमदार व मंत्री सुदिन ढवळीकर यांचा वेगळाच हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला. गावातील पारंपरिक शेती, खाजन शेती व त्याला निगडीत असलेली पर्यावरणीय व्यवस्था जुन्या लोकांनी विचारपूर्वक उभारलेली आहे. त्यामागे गावाचे हित आहे. हजारो खारफुटीच्या झाडांचा संहार कऊन हा प्रकल्प उभारला गेल्यास भविष्यात गावावर पुराचे संकट तर निश्चितच आहे. शिवाय असह्dया दुर्गंधीमुळे लोकांना गावात राहणे कठिण होणार आहे, असे परब म्हणाले.
उंडिर गावातील लोकांनी निमंत्रण देऊन हा प्रकल्प मागविलेला नाही. ग्रामस्थाना नको असल्यास कुणीही तो त्यांच्यावर लादू शकणार नाही. स्थानिक आमदार व सरकार हुकुमशाहीने वागत असल्यास ग्रामस्थांना एकजुट होऊन त्याविरोधात प्रखर लढा द्यावाच लागेल. मेळावलीची पुनरावृत्ती मडकईत होण्याची गरज आहे. लोकांना गृहित धरणाऱ्या आमदाराच्या आसनाला धक्के बसू लागल्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत होतील.
आमदार विरेश बोरकर म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून ग्रामस्थ या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. त्यासाठी त्यांनी न्यायालयातही लढा दिला. मुळात हा प्रकल्प उंडीर ग्रामस्थांच्या हितापेक्षा त्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींची वेगळी आर्थिक गणित असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्प उभारण्यापूर्वी गावात जनसुनावणी झालेली नाही. लोकांना अंधारात ठेऊन त्यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर खटले भरले जात असून सरकारची ही दडपशाही आहे. गोमंतकीय भूमिपुत्रांवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, तेथे रिव्होल्युशनरी धावून येणार असे आमदार बोरकर म्हणाले. मात्र ग्रामस्थांनीही आपला गांव टिकवून ठेवण्यासाठी जागृत होऊन लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
उंडीर गावात होऊ घातलेल्या मलनिस्सारण प्रकल्पामागे कोळसा वाहतुकीच्या व्यवस्थेचा कुटील डाव असल्याचा आरोप प्रेमानंद गावडे यांनी केला. मलनिस्सारण प्रकल्प उभारायचे झाल्यास ते दुर्भाट गावाप्रमाणे छोट्या स्वऊपाचे व तेथील लोकवस्तीची गरज ओळखून उभारले जावेत. ज्यामुळे पर्यावरणाला धक्का लागणार नाही, असे विश्वेश नाईक म्हणाले. आपल्या प्रास्ताविक भाषणात मुकुंद नाईक यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय हरित लवादाने प्रकल्पासाठी 109 झाडे कापण्याची परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात हजारो खारफुटीचा संहार होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मंथन नाईक यांनीही प्रकल्पाविषयी आपले विचार मांडले. सदानंद नाईक यांनी सूत्रसंचालन केले.









