खानापूर म. ए. समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : सरकारने 15 हून कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका खानापूर तालुक्यातील 64 शाळांना बसणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. खानापूर तालुका हा दुर्गम तालुका असल्यामुळे येथे वाडी, वस्त्यांवर शाळा भरविल्या जातात. पहिली ते चौथीच्या अनेक प्राथमिक शाळा या वाड्यांमध्ये मिळेल त्या जागेत भरविल्या जातात. 20 ते 25 कुटुंबाची मिळून एक वाडी असते. त्यामुळे या शाळांमध्ये मर्यादित विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परंतु सरकारच्या नव्या नियमावलीमुळे सर्व लहान शाळा इतर शाळांमध्ये स्थलांतरित कराव्या लागणार आहेत. तालुक्यातील दुर्गम गावामध्ये हिंस्त्र श्वापदाचा धोका असल्यामुळे लहान मुलांना इतर गावांना पाठविणे जिकीरीचे काम आहे. त्यामुळे शाळांचे स्थलांतर करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदन स्वीकारून आपण याविषयी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, संजय पाटील, उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, डी. एम. भोसले, रमेश धबाले, गणेश पाटील उपस्थित होते.









