हेस्कॉमचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन
बेळगाव : यावर्षी अधिकतर गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची उंची वाढवली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती मंडपापर्यंत आणताना व विसर्जनादिवशीही विद्युतवाहिन्यांचा धोका निर्माण झाला आहे. काही उत्साही कार्यकर्ते काठीच्या साहाय्याने विद्युतवाहिन्या ढकलण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे गणेशमूर्तीची ने-आण करताना संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांना माहिती देणे शहाणपणाचे ठरणार आहे. मंगळवार दि. 19 रोजी पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. बेळगावमध्ये भव्यदिव्य गणेशमूर्ती तयार केल्या जातात. मागील दोन ते तीन वर्षांपासून मूर्तींच्या उंचीवर बंधने होती. यावर्षी मात्र गणेशमूर्तींची उंची वाढल्याचे चित्र दिसत आहे. गणेशमूर्तींची उंची वाढली असली तरी लहान गल्लीमध्ये विद्युतवाहिन्यांची उंची अद्याप कमी आहे. काही ठिकाणी मुख्य सर्व्हिस वायर रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला घालण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी मूर्ती घेऊन जाताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सांबरा रोडवर बाहेर गावची गणेशमूर्ती ट्रकमधून नेली जात होती. एका ठिकाणी विद्युतवाहिनी जवळ असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बांबूच्या साहाय्याने विद्युतवाहिनी ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विद्युतवाहिनी तुटून खाली पडली. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नसला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी सदाशिवनगरमध्ये असाच एक प्रकार घडून जीवितहानी घडली होती.
हेस्कॉम कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
यावर्षी गणेशमूर्तींची उंची वाढविण्यात आल्याने अडचणी निर्माण होत आहेत. विद्युतवाहिन्यांची उंची वाढविणे काही ठिकाणी शक्य नाही. तसेच विद्युतवाहिन्या काढून गणेशमूर्ती नेण्यासाठी बराच कालावधी लागेल. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी काठीने विद्युतवाहिन्या बाजूला सरकविण्याचे धाडस न करता संबंधित हेस्कॉम कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
– विनोद करुर (साहाय्यक कार्यकारी अभियंते)









