आपल्याकडे आजही खेडेगावांमध्ये किंवा काही शहरांमध्येही घरच्या अंगणात विवाह करण्याची पद्धत आहे. अंगणात होमाभोवती सात फेरे घातले गेले नाहीत, तर ते घरच नव्हे, असे मानायची पद्धतीही आहे. तथापि, राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात आटी नावाच्या गावात गेल्या 350 वर्षांमध्ये एकही विवाह घराच्या अंगणात झालेला नाही. याचा अर्थ या गावात लग्ने होतच नाहीत, असा नाही. ती होतात. अगदी धूमधाम करुन साजरी केली जातात. पण ती अंगणात नाही.
या गावातील गेल्या साडेतीनशे वर्षांमधील सर्व विवाह गावातील चामुंडा माता मंदिरात झालेले आहेत. तोरणही येथेच बांधले जाते आणि होमाभोवती सात फेरे घेऊन वैदिक मंत्रोच्चारात विवाह या मंदिरातच साजरा केला जातो. आता ही प्रथा का पडली याचे कारणही तसेच आहे. या गावातील लोकांचा विश्वास असा आहे, की जर या मंदिरात विवाह समारंभ न करता तो घराच्या अंगणात केला, तर वधूला मूल होत नाही. ती अपत्यविहीन राहते. ही समजूत पूर्वी घडलेल्या काही घटनांमधून निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील कोठेलेही घर विवाह अंगणात करण्याचे धाडस करीत नाही. परिणामी, सर्व विवाह या मंदिरातच केले जातात..
केवळ विवाहच या मंदिरात होतो असे नाही, तर वधू बाहेरच्या गावातील असेल तर तिला लग्नानंतरचा पहिला दिवस या मंदिरातच वास्तव्य करावे लागते. त्यानंतरच तिचा गृहप्रवेश केला जातो. गृहप्रवेश करण्याआधी सकाळी मंदिरात नववधूकडून देवीची पूजा करुन घेतली जाते. तसेच इतरही धार्मिक विधी केले जातात. ते सर्व यथासांग पार पडल्यानंतरच गृहप्रवेश होतो. गावातील मुलीचे लग्न बाहेरगावच्या मुलाशी ठरले, तरी ते या मंदिरातच होते. अनेक अभ्यासकांनी या प्रथेचा अभ्यास करुन आणि ऐतिहासिक माहिती संकलित करुन या परंपरेमागची कारणे शोधून काढली आहेत. आधुनिक काळातही ही परंपरा जपली जाते.









