भटक्या श्वानांच्या संदर्भात ‘सर्वोच्च’ सूचना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या राजधानी भागातील भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत बंदिस्त स्थानी नेण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशावर टीकात्मक प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक आदेश काढला असून तो सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातील भटक्या श्वानांच्या संदर्भात आहे. न्यायालयाच्या परिसरात आहार करणाऱ्यांनी उरलेले खाण्याचे पदार्थ उघड्यावर टाकू नयेत. ते कचरापेटीतच टाकावेत, असा आदेश देण्यात आला आहे. खाऊन उरलेले अन्न उघड्यावर टाकल्याने ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री न्यायालय परिसरात येतात.
त्यामुळे या आदेशाचे कसोशीने पालन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सोमवारी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. श्वानप्रेमी आणि प्राणीप्रेमींनी या आदेशावर टीका केली आहे, तर सर्वसामान्य नागरीकांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले हे सर्क्युलर पाहिले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातील कॉरीडॉर्समध्ये तसेच काही वेळा लिफ्टमध्येही भटक्या आणि मोकाट कुत्रांच्या वावर होत आहे. ही स्थिती सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.









