जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सक्त ताकीद : बैठकीत कामासंदर्भात केले मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिह्यामध्ये मोठय़ा संख्येने नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायती आहेत. त्या सर्व संस्थांच्या माध्यमातून होणारी कामे नियोजनबद्धरित्या आणि वेळेत करा, कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये याची दखल घ्या, ‘सकाल’बाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. तेव्हा कोणाचीही कामे प्रलंबित ठेवू नका, अशी सक्त ताकीद नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
नगरविकास अधिकाऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत त्यांनी अधिकाऱयांना सक्त ताकीद केली. जिल्हाधिकारी म्हणून नितेश पाटील हे दाखल होताच त्यांनी अधिकाऱयांना वेळेत कामे करण्याची सूचना केली. बैठका घेऊन अधिकाऱयांना याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये. तक्रार आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. संपूर्ण वर्षात जी कामे करायची आहेत त्यांचे नियोजन व आराखडा तयार ठेवा. त्यानुसार कामे वेळेत पूर्ण करा. विशेष करून कचऱयाची उचल, आवास योजनेबाबत जागरूक रहा. जेथे पाण्याची समस्या आहे ती सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक मतक्षेत्रात ज्या व्यक्तींना घरे मंजूर झाली आहेत त्याबाबतची संपूर्ण यादी तयार करा. त्या मतक्षेत्राच्या लोकप्रतिनिधींना ती द्या, त्यानंतर संबंधितांना वेळेत निधी उपलब्ध करा. घरे मंजूर झाल्यानंतर संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे. बँक लिंक योग्यप्रकारे करा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीला नगरविकास अधिकारी ईश्वर उळागड्डी व अधिकारी उपस्थित होते.









