इस्लामिक को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनला भारताने सुनावले : ओआयसी महासचिवांचा पीओके दौरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्लामिक सहकार्य संघटनेचे (ओआयसी) महासचिव एच. ब्राहिम ताहा यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. याप्रकरणी भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओआयसीचे या क्षेत्राशी निगडित कुठल्याही मुद्द्यांवर काहीच देणेघेणे नसल्याचे भारताने सुनावले आहे. ओआयसी महासचिवांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करत जम्मू-काश्मीरसंबंधी टिप्पणी केली होती.
भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा ओआयसी आणि त्याच्या महासचिवाचा प्रयत्न पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले आहे.
ओआयसीने यापूर्वीच घोर सांप्रदायिक, पक्षपाती आणि मुद्द्यांवर तथ्यात्मक स्वऊपात चुकीचा दृष्टीकोन अवलंबून स्वत:ची विश्वासार्हता गमाविली आहे. ओआयसीचे महासचिव आता दुर्दैवाने पाकिस्तानचे मुखपत्र ठरले असल्याची टीका विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी मंगळवारी केली आहे.
ओआयसीकडे जम्मू-काश्मीरशी संबंधित प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाच अधिकार नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतात विशेषकरूनन जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादाला बळ देण्याचा पाकिस्तानचा अजेंडा ओआयसीने जगासमोर आणावा असे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सुनावले आहे.
ताहा अन् पाक पंतप्रधानांची भेट
ओआयसी महासचिव ताहा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जम्मू-काश्मीरसंबंधी कूटनीतिक प्रयत्नांची माहिती दिली होती, असा दावा संघटनेकडून करण्यात आला. ओआयसी ही मुस्लीम देशांची संघटना आहे. ब्राहिम ताहा हे 10-12 डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय पाकिस्तान दौऱ्यावर होते. काश्मीर विवाद ओआयसीच्या अजेंड्यात सर्वोच्च प्राथमिकतेवर असल्याचे विधान ताहा यांनी सोमवारी पीओके दौऱ्यानंतर केले होते.
पाकिस्तानची री ओढणारी भूमिका
इस्लामिक देशांची संघटना भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेचा मार्ग शोधून काश्मीर प्रश्नी तोडगा काढू पाहत आहे. काश्मीर प्रश्नावर अन्य देशांना सोबत येण्याचे आवाहन करत आहोत. पाकिस्तान समवेत अन्य देशांसोबत या विषयावर चर्चेच आराखडा तयार करत आहोत. काश्मीरमधील सद्यस्थितीवरून एक व्यापक अहवाल संघटनेला सोपविला जाणार आहे. काश्मीर प्रश्न हा कूटनीतिक मुद्दा असून त्याची चर्चा रस्त्यावर उभी राहून केली जाऊ शकत नाही. याचमुळे आम्ही या मुद्द्यावर अन्य देश, संघटनांचे समर्थन इच्छितो असे ताहा यांनी म्हटले होते. ताहा यांच्यासोबत यावेळी पाकव्याप्त काश्मीरचे कथित अध्यक्ष सुल्तान महमूद, कथित पंतप्रधान सरदार तन्वीर इलियास, पाक पंतप्रधानांचे सल्लागार कमर जमान कायरा उपस्थित होते.









