ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी, हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. सध्या वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातल्या झेंडावंदनासाठी मी किंवा चंद्रकांत पाटील नाराज नाही. कोणीही रुसले, फुगलेले नाही. वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती जाणून घ्या. मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही 15 ऑगस्टचं झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी माध्यमांना चुकीच्या बातम्या देऊ नका, असं आवाहन केलं.
अजित पवार म्हणाले, 26 जानेवारी आणि 1 मे महाराष्ट्र दिन दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात.26 जानेवारीला पुण्यात मी ध्वजारोहण केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं. पण तुम्ही लगेच उलटय़ा बातम्या चालवल्या. क्षुल्लक कारणांचा बाऊ केला. तुम्ही माहिती घ्या. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही.
माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे काहीही बातम्यांमध्ये सांगता. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.