मडगाव ; गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही चर्चचे धर्मगरू प्रार्थनासभांवेळी वादग्रस्त विधाने करून धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहे. हा प्रकार योग्य नाही. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांमध्ये फुट घालू नका असे आवाहन कुंकळळीचे माजी आमदार क्लाफास डायस यांनी काल रविवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. आर्चबिशप यांच्याकडून धर्मगुरूंना जो संदेश दिला आहे. तो योग्यच आहे. गोव्यात गेल्या कित्येक वर्षापासून धार्मिक सलोखा जतन केला जात आहे. परंतु, हल्लीच जी काही विधाने झाली. त्यातून धार्मिक सलोखा बिघडवू शकतो. तेव्हा सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे असे क्लाफास डायस म्हणाले.
प्रत्येकाला आपला धर्म मोठा आहे. त्यामुळे एका धर्माच्या व्यक्तीने, दुसऱ्या धर्मावर टीका करणे योग्य नव्हेच. गोव्यातील हिंदू बांधव नाताळ सणाच्या वेळी आवर्जुन ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेट देतात. त्याच प्रमाणे गणेश चतुर्थी च्या दिवशी ख्रिस्ती बांधव, हिंदू बांधवांच्या घरी भेट देतात. असा धार्मिक सलोखा अन्य ठिकाणी पहायला मिळत नाही. हा धार्मिक सलोखा जपला पाहिजे असे श्री. डायस म्हणाले. भाजप अल्प संख्याक मोर्चाचे अॅथनी बार्बोझा यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले की, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी धर्मगुरूंना दिलेला संदेश योग्य आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. त्याचे ही आपण समर्थन करतो. धर्मगुरूनी जबाबदारीने वागावे, त्यांनी इतर धर्माचा आदर करावा असे अॅथनी बार्बोझा म्हणाले.









