पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना इशारा : भारत स्वहितासाठी काम करतोय
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे. पाश्चिमात्य देश भारत आणि रशियादरम्यान दरी निर्माण करू पाहत आहेत, परंतु त्यांचा हा प्रयत्न निरर्थक ठरणार आहे, कारण भारत एक स्वतंत्र देश असून स्वत:च्या नागरिकांच्या हितांसाठी काम करतो असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत.
पाश्चिमात्य देश अशा प्रत्येक देशासाठी एक शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जो त्यांच्या एकाधिकाराला विरोध करत आहे. परंतु भारत सरकार स्वत:च्या देशाच्या हिताकरता स्वतंत्र स्वरुपात कार्यरत असल्याचे पुतीन यांनी काळ्या समुद्राला लागून असलेल्या सोची शहरातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी केल्याप्रकरणी भारतीय कंपन्यांवर टीका होत असताना पुतीन यांनी हे वक्तव्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद पेले आहे.
मोदींच्या नेतृत्वात भारताची भरारी
भारत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात वेगाने पुढे जात आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी असून तेथील विकासदर 7 टक्के आहे. भारत अत्यंत सामर्थ्यशाली होत आहे. भारतीय लोक जगाच्या कानाकोपऱ्यात उत्तमप्रकारे कार्य करत आहेत. पंतप्रधान मोदी हे अत्यंत चतुर व्यक्ती आहेत. आमचे त्यांच्याशी अत्यंत चांगले राजनयिक संबंध आहेत. रशिया आणि भारत आर्थिक सुरक्षा तसेच सायबर क्राइमच्या क्षेत्रात मिळून काम करतील. भारत आणि रशिया शतकांपासून मित्र अन् भागीदार राहिले आहेत. दोन्ही देशांनी निश्चित केलेला अजेंडा आम्ही अवश्य साध्य करू असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत.
मेक इन इंडियाचा उल्लेख
पुतीन यांनी भारत किंवा पंतप्रधान मोदींची प्रशंसा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मागील महिन्यात पुतीन यांनी मेक इन इंडिया मोहिमेचा उल्लेख केला होता. पूर्वी आमच्याकडे स्वत:च्या देशात निर्मित कार्स नव्हत्या, परंतु आता आहेत. ऑडी आणि मर्सिडीजच्या तुलनेत त्या कमी चांगल्या दिसतात हे सत्य आहे, परंतु ही काही समस्या नाही. आम्ही रशियात निर्मित वाहनांचा वापर करायला हवा. याकरता भारताचे अनुकरण केले जावे. भारत स्वत:च्या देशात वाहनांची निर्मिती करत असून त्यांचा वापर करत आहे असे पुतीन यांनी म्हटले होते.









