सदन अध्यक्षांची खोचक सूचना, राज्यसभा 13 मार्चपर्यंत स्थगित
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभेत प्रतिदिन घडणारा प्रचंड गदारोळ आणि त्यामुळे होणारी कामकाजाची हानी यामुळे उद्विग्न झालेल्या सभाध्यक्षांनी सदस्यांना तंबी दिली आहे. लोकसभेचे पावित्र्य राखा, तिचे रुपांतर महानगरपालिकेत करु नका, अशी खोचक टिप्पणी त्यांनी सदस्यांना उद्देशून केली. पश्चिम बंगालच्या कर्मचाऱयांच्या मुद्दय़ासंदर्भात लोकसभेत भाजप आणि तृणमूल काँगेसच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने त्यांनी सदस्यांना सूचना करताना ही खोचक टिप्पणी केली.
राज्यसभेतही मोठय़ा प्रमाणात गोंधळाचे वातावरण राहिले. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या प्रथम सत्राचा राज्यसभेतील सोमवारचा दिवस शेवटचा होता. त्यामुळे सदनाची कार्यवाही 13 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा सभाध्यक्षांनी केली. त्यानंतर या अधिवेशनाच्या दुसऱया सत्राला प्रारंभ होणार आहे.
ओम बिर्ला संतप्त
लोकसभेत वारंवार गोंधळ करुन कामकाजात व्यत्यय का आणला जातो, असा प्रश्न करत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संताप व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्याविषयीचा मुद्दा भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात उपस्थित केला होता. तेथील कर्मचाऱयांना महागाई भत्ता मिळालेला नाही. ते उपोषणाला बसले आहेत. या संदर्भात केंद्र सरकार थेट काही कार्यवाही करु शकते का? असा प्रश्न भाजप खासदारांनी उपस्थित केला. त्यावर कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव उत्तर देत असताना तृणमूल काँगेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या प्रश्नाला आक्षेप घेतला, हा राज्याचा प्रश्न असल्याने लोकसभेत तो उपस्थित करु नये, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावर भाजप सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये घोषणायुद्ध सुरु झाले. त्यामुळे कामकाज पुढे सरकू शकले नाही.
खर्गेंना अनुमती
राज्यसभेत सभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी सदस्यांना कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे काही शब्द सुनावले. कामकाज होऊ नये असा प्रयत्न काही सदस्यांकडून हेतुपुरस्सर केला जातो. ही बाब आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी काँगेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्याची अनुमती दिली. तथापि, त्यांचे वक्तव्य कामकाजाच्या इतिवृत्तातून काढून टाकण्यात आले.
विरोधी बाकांवरुन घोषणा
यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा देऊ सदन डोक्यावर घेतले. त्याला सत्ताधारी बाकांवरुन तसेच जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावर धनखड यांनी सदस्यांच्या या वागणुकीला आक्षेप घेतला. सगळे जग आपल्याकडे पहात आहे. सदस्य असे कसे वागू शकतात, हे कळू शकत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. अखेर सदर 13 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.
विरोधी पक्षांची बैठक संसदेत पुढील भूमिका ठरविण्यासाठी 14 विरोधी पक्षांची बैठक संसदेच्या परिसरात सोमवारी घेण्यात आली होती. लोकसभेत काँगेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीला काँगेससह द्रमुक, राजद, राष्ट्रवादी काँगेस, संजद, आप आणि डावे पक्ष यांचे नेते उपस्थित होते. राज्यसभेतून काँगेसच्या सदस्या रजनी पाटील यांना अर्थसंकल्प अधिवेशनाच्या ऊर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी अनधिकृत व्हिडीओचे वितरण सभागृहात केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या घटनेवरही विरोधी पक्षांच्या बैठकीत विचार करण्यात आला, असे समजते.









