अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बँकांना इशारेवजा सूचना
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रूरपणे कर्जवसुली करण्यावरून बँकांना सतर्क केले आहे. बँकांकडून बळाच्या जोरावर कर्जाची वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. कर्जवसुलीच्या प्रक्रियेदरम्यान कठोर पाऊल उचलणे टाळावे अशी ताकीद सरकारी तसेच खासगी बँकांना देण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये संवेदनशील अन् मानवीय आधारावर कुठलीही कारवाई करावी असे सुचविण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे.
मागील काही काळापासून बँकांच्या कर्जवसुलीच्या पद्धतींवरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंबंधी आता संसदेत मुद्दा उपस्थित झाला आहे. प्रश्नोत्तराच्या तासात बँकांच्या मनमानी अन् अनुचित पद्धतीने कर्जवसुली करण्यात येत असल्याचा आरोप करत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर प्रथम अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिले. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी स्वत: या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी 6 जुलै रोजी सरकारी बँकांच्या प्रतिनिधींसोबत बँकांच्या कामकाजाची समीक्षा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी बँकांना ग्राहकांच्या सुविधा विचारात घेत सेवा सुलभ करण्यासह ग्राहकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते.
रिझर्व्ह बँकेने देखील बँकांच्या रिकव्हरी एजंट्सकडून ग्राहकांचा छळ होत असल्याच्या घटनांची दखल घेतली होती. रिकव्हरी एजंट्सकडून ग्राहकांचा होणार छळ रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली आहेत. यात रिकव्हरी एजंट्सकडून झालेले गैरवर्तन अन् त्यांच्या कारवाईची जबाबदारी आता बँका, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांची असल्याचे नमूद आहे.
आरबीआयचे दिशानिर्देश
रिकव्हरी एजंट्सनी कर्जवसुलीदरम्यान ग्राहकांना धमकावू नये तसेच त्यांचा छळ करू नये हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी बँकांची असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच लोकांच्या खासगीत्वाचे उल्लंघन करत जाहीरपणे त्यांना अपमानित केले जाऊ नये. रिकव्हरी कॉल केवळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच केले जाऊ शकतात. तसेच रिकव्हरी एजंट्स फोन किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश पाठवू शकत नाहीत.









