पुणे / प्रतिनिधी :
मी 85 वर्षांच्या वयात महागाईविरोधात आंदोलन करायचे का? तरुणांनी आंदोलन उभे केले पाहिजे. केवळ राज्यात नव्हे, तर देशात महागाई वाढली आहे. एवढी महागाई आत्तापर्यंत वाढली नव्हती, अशी टीका शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी येथे केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत लोकायुक्त कायदा मसुदा समितीची बैठक यशदा संस्थेत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्य लोकायुक्त कायद्याचा मसुदा तीन वर्षांनी तयार झाला, याचे समाधान आहे. लोकपाल लागू झाल्यानंतर एक वर्षात लोकायुक्त कायदा करायचा, असा नियम होता. खूप चांगला मसुदा तयार झाला, त्याबद्दल समाधानी आहे. हा मसुदा तयार व्हायला उशीर झाला, तरी विधानसभेत लवकर याचे कायद्यात रुपांतर होईल, ही अपेक्षा आहे.
काही दिवसांपूर्वी लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या कामातील दिरंगाई तसेच याबाबत कोणतीही बैठक झाली नसल्याने तातडीने बैठक घ्यावी, असे पत्र अण्णांकडून राज्य सरकारला पाठवण्यात आले होते. त्यानंतर सरकारने ही बैठक बोलावली. आता लोकायुक्त कायदा झालाच पाहिजे. होणार नसेल, तर सरकारने पायउतार व्हावे. गरज पडल्यास यासाठी पुन्हा उपोषण करण्याची आपली तयारी आहे. मात्र, 85 वर्षांच्या वयात उपोषण होणार नाही. कायदा व्हावा, हीच इच्छा, असे पत्र अण्णांनी लिहिले होते. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीला अण्णा हजारे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते.