चार वर्षीय मुलाचे खून प्रकरण
पणजी : कांदोळी येथील 4 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणातील सूचना सेठचा पती वेंकटरमण यांची आज सोमवार 15 जानेवारी रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसेच सूचना हिची पोलीस कोठडी काल रविवारी संपुष्टात आली असून तिची आज न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण 6 दिवसांच्या कोठडीत सूचना रडत असल्याचे समोर आले असून अनेकदा तिने मुलाचा फोटो दाखवण्याची मागणी केली तेव्हा तिला मोबाईलवर फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी ती रडत असे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांच्या समन्सनुसार वेंकटरमण कळंगूट पोलिसांसमोर हजर झाला. त्यावेळी तीन तास त्यांची चौकशी करण्यात येवून अधिकृत जबाबाची नोंद झाली. त्यांना व सूचना अशा दोघांना समोरासमोर आणून पुन्हा चौकशी झाली तेव्हा पुन्हा एकदा दोघांनी एकमेकांवर आरोप केले. दोघे मुलांच्या मृत्यूचा (खुनाचा) दोष एकमेकांवर देऊ लागले. बराच वेळ दोघांचे वादविवाद सुरू होते. शेवटी पोलिसांनी दोघांना अलग केले. सूचनाने खून केल्याचा पुन्हा एकदा इन्कार करून आपण खून केला नसल्याचेही ठासून सांगितले. या प्रकरणातील पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून पोलिसांनी काळजी घेतली असून आज सोमवारी वेंकटरमण यांची डीएनए चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले.









