1962 मध्ये नोबेल पुरस्काराचे मानकरी
वृत्तसंस्था/ शिकागो
डीएनए संशोधक आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉटसन यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. 1953 मध्ये वॉटसन यांनी डीएनएच्या ‘डबल हेलिक्स’ रचनेचा शोध लावला होता. या शोधाने वैद्यकशास्त्र, गुन्हे अन्वेषण, वंशावळ आणि नीतिमत्ता या क्षेत्रात क्रांती घडवून आणल्यामुळे त्यांचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले होते. हा महत्त्वाचा शोध विज्ञानातील सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होता. 1962 मध्ये जेम्स वॉटसन यांना फ्रान्सिस क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांच्यासोबत नोबेल पुरस्कार मिळाला होता. शिकागोमध्ये जन्मलेल्या जेम्स वॉटसन यांनी अवघ्या 24 व्या वर्षी मिळवलेल्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक दशके वैज्ञानिक जगात आदरणीय व्यक्तिमत्व अशी ओळख प्राप्त झाली. तथापि, त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस वादग्रस्त टिप्पण्यांसाठी त्यांना टीकेचा सामना करावा लागला.
जेम्स वॉटसन यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्यासमवेत डीएनएची दुहेरी हेलिक्स रचना ओळखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांनी केलेले हे संशोधन 20 व्या शतकातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक शोधांपैकी एक होते. तथापि, वंश आणि लिंग यावरील त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काही वैज्ञानिक समुदाय त्यांच्यापासून दूर गेला होता. त्यांच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमध्ये कृष्णवर्णीय लोक गोऱ्या लोकांपेक्षा कमी बुद्धिमान असतात हे होते.









