वृत्तसंस्था /चेन्नई
‘सनातन धर्म’ अर्थात, हिंदू धर्म हा कोरोना, हिंवताप, एडस् किंवा महारोग यांच्या विषाणूसारखा घृणास्पद आहे’ असे प्रक्षोभक आणि अवमानजनक विधान अंगाशी आल्यानंतर आता द्रमुक पक्षाने या मुद्द्यापासून माघार घेण्यास प्रारंभ केला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आता हा विषय वाढवू नये, अशी सूचना आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन धर्माचे संरक्षण करा अशी स्पष्ट सूचना आपल्या मंत्र्यांना केली आहे. ते या मुद्द्याचा राजकीय लाभ उठविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आपण ही संधी देता कामा नये. म्हणून आता या विषयावर द्रमुकच्या कोणत्याही नेत्याने अगर कार्यकर्त्याने विधाने करु नयेत. भाजपच्या हाती मुद्दा देऊ नये, असे आवाहन स्टॅलिन यांनी गुरुवारी केले. द्रविडर कझगम पक्षाचे नेते के. वीरमणी यांनीही हा विषय आवरता घेण्याचे आवाहन पेले. या विधानांचा लाभ भाजप घेणार आहे. दैनंदिन समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजप या विधानाचा उपयोग करु शकतो. म्हणून आपण या जाळ्यात अडकता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.









