वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाच्या परिसरात एका इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. आता या घटनेवरून राजकीय वाद उभा ठाकला आहे. बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी द्रमुकचा कार्यकर्ता असून त्याच्यावर यापूर्वीही अशाप्रकारचे आरोप झाले होते, असा दावा भाजपने केला आहे.
तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अण्णामलाई यांनी द्रमुक नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन तसेच वरिष्ठ द्रमुक नेत्यांसोबत आरोपी ज्ञानशेखरनची छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्ञानशेखरन हा द्रमुकच्या सैदाई ईस्ट विद्यार्थी शाखेचा उपसंघटक आहे. तामिळनाडूत अशाप्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये एक स्पष्ट पॅटर्न दिसून येतो. एक गुन्हेगार द्रमुकचा सदस्य होतो आणि त्या क्षेत्रात द्रमुकच्या नेत्यांचा निकटवर्तीय ठरतो. मग त्याच्या विरोधात नोंद सर्व गुन्हे मागे घेतले जातात, असा आरोप अण्णामलाई यांनी केला आहे.
द्रमुक नेते आणि मंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांनी ज्ञानशेखरच्या विरोधात नोंद गुन्ह्यांचा तपास केला नाही. यामुळे त्याला आणखी गुन्हे करण्याची संधी मिळाली. एका निर्दोष विद्यार्थिनीसोबत झालेली ही क्रूरता 15 गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पोलिसांनी कारवाई न केल्याने घडली आहे. याकरता पूर्णपणे द्रमक सरकार जबाबदार असल्याचा शाब्दिक हल्लाबोल अण्णामलाई यांनी केला.
अण्णा विद्यापीठ परिसरात बलात्काराची घटना म्हणजे सत्तारुढ द्रमुक हा समाजविरोधी घटकांचा अ•ा असल्याचा पुरावा आहे. द्रमुकचे नेते आणि कार्यकर्ते हे सर्वप्रकारच्या गुन्हेगारीत सामील असल्याची टीका विरोधी पक्षनेते आणि अण्णाद्रमुकचे प्रमुख ई. पलानिसामी यांनी केली आहे. ज्ञानशेखरन हा द्रमुकशी संबंधित असल्यानेच त्याला पोलिसांनी अभय दिले होते असा आरोप आहे.
अण्णा विद्यापीठातील इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर सोमवारी रात्री ज्ञानशेखरनने बलात्कार केला होता. तर 37 वर्षीय ज्ञानशेखरनने स्वत:चा गुन्हा मान्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.









