अण्णाद्रमुककडून टीका : रक्ताने माखलेले आहेत स्टॅलिन यांचे हात
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत 21 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे राजकीय वादाला जन्म मिळाला आहे. अण्णाद्रमुक प्रमुख पलानिस्वामी यांनी याप्रकरणी सत्तारुढ पक्ष द्रमुक आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना लक्ष्य केले आहे. द्रमुकमुळेच तामिळनाडूत नीट विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे हात नीट विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेले असल्याची टीका पलानिस्वामी यांनी केली आहे.
मनमोहन सिंह सरकारमध्ये द्रमुकच्या एका खासदारानेच नीट विधेयक मांडले होते. 2010 मध्ये नीटची अधिसूचना जारी झाली होती आणि 2012 मध्ये द्रमुक नेते आणि तत्कालीन आरोग्य आणि परिवार कल्याण विभागाचे राज्यमंत्री गांधी सेल्वन यांनीच हे विधेयक संसदेत मांडले होते. विधेयक संमत झाल्यावर 2013 मध्ये पहिल्यांदा नीट अंतर्गत भारतात वैद्यकीय प्रवेश परीक्षा झाली होती. त्यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय वैद्यकीय पूर्व चाचणी आणि प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी प्रवेश परीक्षा पार पडत होती. नीट लागू झाल्यावर राज्यांची स्वत:ची प्रवेशपरीक्षा संपुष्टात आली होती.
याचाच संदर्भ देत पलानिस्वामी यांनी द्रमुकमुळेच तामिळनाडूची स्वत:ची प्रवेशपरीक्षा संपुष्टात आली आणि राज्यातील मुलांना नीट देणे भाग पाडले, जे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरल्याचा आरोप केला आहे.
2014 पूर्वी काँग्रेस केंद्रात सत्तेवर होता, तेव्हा द्रमुकने नीटची सुरुवात केली. द्रमुकने याचबरोबर नीटला होत असलेला विरोध रोखण्यासाठी काँग्रेस पक्षासोबत मिळून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. द्रमुकच्या या कृतीमुळे तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना सुरुंग लागला. आता द्रमुक केंद्रात सत्तेवर आल्यावर नीट होऊ देणार नसल्याचा कांगावा करत आहे. नीटमुळे तामिळनाडूत होत असलेले मृत्यू द्रमुकसाठी चिंतेचा विषय नसल्याचा आरोप पलानिस्वामी यांनी केला.
अपयशाच्या भीतीने आत्महत्या
चेन्नईत 21 वर्षीय देवदर्शिनीने आत्महत्या केली होती. यंदाच नीटमध्ये यश मिळू शकणार नाही अशी भीती तिला सतावत होती. यापूर्वी तीनवेळा ती या प्रवेशपरीक्षेत यश मिळवू शकली नव्हती.









