वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी द्रमुकसमवेत विरोधी पक्षांच्या आघाडीला हिंदू तसच सनातन धर्माच्या विरोधात ठरविले आहे. द्रमुक नेते अणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपविणार असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस भारताला तोडू पाहणाऱ्या गटाचे समर्थन करत आहे. द्रमुकचे घोषित धोरण हे हिंदूविरोधी राहिले असल्याची टीका सीतारामन यांनी केली आहे.
द्रमुकच्या हिंदूविरोधी धोरणाला तामिळनाडूच्या लोकांनी नेहमीच झेलले आहे. उर्वरित देशाला ही बाब समजली नाही कारण भाषेचा अडथळा आहे. द्रमुक मागील 70 वर्षांपासून सनातन विरोधात कृती करत आहे. सध्या सोशल मीडियाचा काळ असल्याने लोकांना अनुवादकाची गरज भासत नाही. द्रमुकचे नेते काय म्हणत आहेत हे लोकांना सहजपणे कळत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
उदयनिधी यांचे वक्तव्य मंत्र्याच्या स्वरुपात त्यांच्या शपथेचेही उल्लंघन असल्याचा दावा सीतारामन यांनी केला. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया अन् डेंग्यू या आजारांशी केली होती. तर द्रमुक नेते ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीसोबत केली होती.
जी-20 च्या यशाबद्दल आनंद
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भारताच्या अध्यक्षतेतील दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल आनंद व्यक्त केला. भारताने सर्व महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सहमती निर्माण केल्याचे त्या म्हणाल्या. आभासी चलनासंबंधी विविध देशांनी वेगवेगळे धोरण स्वीकारल्यास नुकसानच होणार आहे. संयुक्तिक कारवाई होण्याची गरज असल्याने सखोल विचारविमिनय केला जाणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.









