अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसवर चार सेट्सनी मात
वृत्तसंस्था/ लंडन
सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने, ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी प्रथमच गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचे आव्हान संपुष्टात आणत सातव्यांदा विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
गेम किंवा सेटनी पिछाडीवर पडला असला तरी जोकोविच त्याने कधीही विचलित होत नाही, याचे प्रत्यंतर त्याने पुन्हा एकदा आणून दिले. पहिल्या सेटमध्ये किर्गीओसने बाजी मारत आघाडी घेतली तरी नंतरचे तीन सेट्स जिंकून सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्याने ही लढत 4-6, 6-3, 6-4, 7-6 (7-3) अशी जिंकली. ग्रासकोर्टवरील या स्पर्धेत जोकोविच आता सलग 28 सामने अपराजित राहिला आहे. कारकिर्दीतील त्याचे हे 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असून रॉजर फेडररला त्याने आता मागे टाकले आहे. फक्त राफेल नदाल त्याच्यापेक्षा पुढे असून त्याची सर्वाधिक 22 अजिंक्यपदे झाली आहेत. पुरुषांमध्ये फक्त रॉजर फेडररने सर्वाधिक आठ अजिंक्यपदे विम्बल्डनमध्ये मिळविली आहेत.

येथील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतही दहाव्या मानांकित यानिक सिनेरविरुद्ध खेळताना जोकोविच दोन सेट्सनी पिछाडीवर पडला होता. त्यानंतर उपांत्य फेरीतही कॅमेरॉन नोरीविरुद्ध त्याने पहिला सेट गमविला होता. गेल्या वर्षीही त्याने अंतिम फेरीत पहिला सेट गमविला होता. त्याआधी 2019 मध्ये फेडररविरुद्ध दोन चॅम्पियनशिप गुण वाचवले होते.
40 वे मानांकन असलेला किर्गीओस 2001 नंतर ही स्पर्धा जिंकणारा पहिला बिगरमानांकित खेळाडू होण्याच्या प्रयत्नात होता. 2001 मध्ये गोरान इव्हानसेविचने असा बहुमान मिळविला होता. विशेष म्हणजे इव्हानसेविच हा सध्या जोकोविचचा प्रशिक्षक आहे. 27 वर्षीय किर्गीओसने यापूर्वीच्या 29 ग्रॅडस्लॅममध्ये एकदाही उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारली नव्हती. साडेसात वर्षापूर्वी त्याने शेवटची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. यावेळी मात्र त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सामन्यात 30 बिनतोड सर्व्हिस केल्या. पण जोकोविचच्या अनुभवापुढे तो शेवटी कमी पडला.









