अमेरिकन ओपन टेनिस : अंतिम लढतीत मेदवेदेव्हवर मात, महिला दुहेरीत डाब्रोवस्की-रूटलिफ विजेत्या
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला तीन सेट्सच्या चुरशीच्या लढतीत पराभूत केले. त्याचे हे विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असून 1968 मध्ये खुली स्पर्धा सुरू झाल्यानंतर 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा तो पहिला टेनिसपटू बनला आहे. विशेष म्हणजे या लढतीवेळी 23 ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्सही उपस्थित होती. महिला दुहेरीत गॅब्रिएला डाब्रोवस्की व इरिन रूटलिफ यांनी जेतेपद पटकावले.
36 वर्षीय जोकोविचने मेदवेदेव्हवर अंतिम झुंजीत 6-3, 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली. महिलांमध्ये मार्गारेट कोर्टनेही 24 अजिंक्यपदे मिळविली होती. पण त्यापैकी 13 जेतेपदे ग्रँडस्लॅममध्ये व्यावसायिक टेनिसपटूंना सामील करून घेण्याआधीची होती. या जेतेपदामुळे जोकोविचने एटीपी क्रमवारीतील अग्रस्थानही पुन्हा हस्तगत केले आहे. पावणेदोन तास रंगलेल्या दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव्हने जोकोविचला कडवी लढत दिली होती. या सेटमध्ये काहीवेळा तो मागेही पडला होता. पण टायब्रेकरपर्यंत लांबलेला हा सेट जिंकण्यात जोकोविच यशस्वी ठरला.
यापूर्वी 2021 मध्ये मेदवेदेव्हने जोकोविचला हरवून या स्पर्धेचे जेतेपद मिळविल्याने एका कॅलेंडर वर्षात ग्रँडस्लॅम साधणारा पहिला टेनिसपटू होण्याची जोकोविचची संधी हुकली होती. जोकोविचने एकंदर चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन 10 वेळा, विम्बल्डन स्पर्धा सातवेळा, फ्रेंच ओपन तीनवेळा जिंकल्या आहेत. पुरुषांमध्ये सर्वाधिक स्लॅम अजिंक्यपदे मिळविण्यात तो आता आघाडीवर आहे. स्पेनच्या राफेल नदालने 22, स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या जानेवारीपासून नदाल दुखापतीमुळे टेनिसपासून दूर आहे तर फेडररने मागील वर्षी निवृत्ती जाहीर केली.
एनबीए स्टार ब्रायंटला मानवंदना
कुटुंबियांना आलिंगन देत जेतेपद साजरे केल्यानंतर त्याने 24 क्रमांकाचा टी शर्ट परिधान केला, त्यावर ‘माम्बा फॉरेव्हर’ असेही लिहिले होते. याद्वारे त्याचा मित्र महान बास्केटबॉलपटू कोब ब्रायंटला त्याने मानवंदना दिली. ब्रायंट 24 क्रमांकाचीच जर्सी वापरत असे. या वर्षातील ग्रँडस्लॅममध्ये जोकोविचने 28 पैकी 27 सामने जिंकले असून जुलैमध्ये विम्बल्डनच्या अंतिम फेरीत त्याला अल्कारेझकडून एकमेव पराभव स्वीकारावा लागला. यावेळी मेदवेदेव्हने अल्कारेझला उपांत्य फेरीत हरवून अंतिम फेरी गाठली होती तर जोकोविचने उपांत्य फेरीत बिगरमानांकित अमेरिकेच्या बेन शेल्टनला हरवून अंतिम फेरी गाठली होती.
डाब्रोवस्की-रूटलिफ यांचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद

महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की व न्यूझीलंडची इरिन रूटलिफ यांनी चौथ्यांदा एकत्र खेळताना ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी 2020 चे चॅम्पियन्स लॉरा सीगमंड व व्हेरा व्होनारेव्हा यांच्यावर 7-6 (11-9), 6-3 अशी मात केली. या दोघींचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्यांना येथे 16 वे मानांकन देण्यात आले होते. मॉट्रियलमधील स्पर्धेपासून त्या दोघी एकत्र खेळत आहेत. दोन्ही जोड्यांनी पहिल्या सेटमध्ये तोडीस तोड खेळ केला. पण त्यात विजयी जोडीनेच अखेर बाजी मारली. सीगमंड व व्होनारेव्हा यांनी 2020 मध्ये येथे जेतेपद मिळविले त्यावेळी त्या प्रथमच एकत्र खेळल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत एकत्र खेळताना चार अजिंक्यपदे मिळविली आहेत.









