वृत्तसंस्था/ लंडन
सर्बियाचा टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने 2023 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. एटीपी मानांकनात वर्षअखेरीस जोकोविचने विक्रमी आठव्यांदा अग्रस्थान आपल्याकडे ठेवण्याचा पराक्रम केला आहे.
2023 च्या टेनिस हंगामामध्ये जोकोविचने चारपैकी तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या जानेवारीत त्याने ऑस्टेलियन ग्रँडस्लॅम, जूनमध्ये फ्रेंच ग्रँडस्लॅम तर सप्टेंबरमध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम अमेरिकन टेनिस स्पर्धेत केला. 36 वर्षीय जोकोविचने स्पेनच्या नवोदित अॅल्कारेझकडील अग्रस्थान स्वत:कडे खेचून आणले. 2023 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपी मानांकनात जोकोविच पहिल्या तर स्पेनचा अॅल्कारेझ दुसऱ्या स्थानावर आहे. रशियाचा मेदव्हेदेव तिसऱ्या, इटलीचा सिनेर चौथ्या, रशियाचा रुबलेव्ह पाचव्या स्थानावर आहेत.
महिलांच्या विभागात डब्ल्यूटीए टूरवरील एकेरीच्या मानांकनात वर्षअखेरीस पोलंडच्या इगा स्वायटेकने अग्रस्थान मिळविले आहे. स्वायटेकने सलग दुसऱ्या वर्षी वर्ष अखेरीस अग्रस्थान स्वत:कडे ठेवण्याचा पराक्रम केला आहे. स्वायटेकने गेल्या महिन्यात डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धा जिंकली. तसेच तिने फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. डब्ल्यूटीए ताज्या मानांकनात स्वायटेक पहिल्या, सबालेंका दुसऱ्या, कोको गॉफ तिसऱ्या स्थानावर आहे. रिबाकीना चौथ्या तर पेग्युला पाचव्या स्थानावर आहे.









