पुरुष दुहेरीत वाईल्डकार्ड प्रवेशधारक जोडी अजिंक्य, महिला दुहेरीत क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हाने जेतेपद राखले
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसचा विजय मिळविला. पुरुष दुहेरीत वाईल्डकार्ड प्रवेशधारक ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाता व जेसन कुबलर यांनी अजिंक्यपद मिळविले तर महिला दुहेरीत बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी जेतेपद स्वतःकडेच राखले.

जोकोविचने सित्सिपसवर 6-3, 7-6 (7-4), 7-6 (7-5) अशी मात करून 22 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. या जेतेपदासह त्याने एटीपी क्रमवारीतही पहिले स्थान पुन्हा पटकावले आहे. मागील वर्षी त्याला या स्पर्धेत कोरोना व्हॅक्सिन घेतली नसल्याने खेळता आले नव्हते. लसीकरण झालेल्यांनाच स्पर्धेत प्रवेश देण्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने निर्बंध घातले असल्यामुळे त्याला मागील वर्षी मायदेशी परतावे लागले होते. पण यावेळी निर्बंध मागे घेतले असल्याने त्याला खेळता आले आणि त्याने जेतेपदही पटकावले. या हार्डकोर्टवरील स्पर्धेत त्याने सलग 28 सामने जिंकले आहेत. ही स्पर्धा 9 वेळा जिंकून त्याने याआधीच विक्रम केला होता, आता त्यात दहाव्या जेतेपदाची भर पडली आहे. त्याची एकूण 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे झाली असून विम्बल्डनच्या 7, अमेरिकन ओपनच्या 3, प्रेंच ओपनच्या 2 अजिंक्यपदाचा त्यात समावेश आहे. त्याने आता राफेल नदालच्या सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सित्सिपस दुसऱयांदा अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभूत झाला असून यापूर्वी 2021 पेंच ओपनच्या अंतिम फेरीत तो पराभूत झाला होता.
वाईल्डकार्ड जोडी पुरुष दुहेरीत विजेती

ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या रिंकी हिजिकाता व जेसन कुबलर यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मोनॅकोचा हय़ुगो नीस व पोलंडचा जान झेलिन्स्की यांच्यावर 6-4, 7-6 (7-4) अशी मात करून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले. ऑस्ट्रेलियन जोडीला घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला. या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठताना सहाव्या मानांकित, आठव्या मानांकित जोडय़ांचा पराभव करून सनसनाटी निर्माण केली होती. बिगरमानांकित जोडीने या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याची ही पाचवी वेळ आहे. 85 मिनिटांत त्यांनी हा सामना संपवला. यापूर्वी थानासी कोकिनाकिस व निक किर्गीओस यांनीही वाईल्डकार्ड प्रवेश मिळाल्यानंतर जेतेपद पटकावले होते. मागील वर्षीच्या जानेवारीपासून वाईल्डकार्ड प्रवेशधारक जोडीने ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. मॅथ्यू एब्डन व मॅक्स पर्सेल यांनी मागील वर्षी विम्बल्डनचे जेतेपद मिळविले हेते.
क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हाने जेतेपद राखले

महिला दुहेरीत विद्यमान विजेत्या असलेल्या झेकच्या बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी ग्रँडस्लॅममधील विजयी घोडदौड कायम राखताना अंतिम फेरीत दहाव्या मानांकित शुको आओयामा व इना शिबाहारा या जपानी जोडीचा 6-4, 6-3 असा पराभव केला. या अग्रमानांकित जोडीचे हे या स्पर्धेतील दुसरे जेतेपद असून जेतेपद राखणारी 2014 नंतरची ही पहिलीच जोडी आहे. 2013 व 2014 मध्ये इटलीच्या सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांनी असा पराक्रम केला होता.









