अमेरिकन ओपन टेनिस : कास्पर रुड, सित्सिपस, बुबलिक, सेव्हिले, अँड्रिव्हा यांचे आव्हान समाप्त, डॉमिनिक स्ट्रिकर, थिएमचीही आगेकूच
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोविच, चीनचा झँग झिझेन तसेच स्वीसचा स्ट्रिकर, ऑस्ट्रियाचा थिएम यांनी तर महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ, पोलंडची इगा स्वायटेक यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एब्डन यांनी पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. बुधवारी खेळवण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोविचने स्पेनच्या मिरालेसचा 6-4, 6-1, 6-1 अशा सेट्समध्ये फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. या स्पर्धेत जोकोविचचे लक्ष आता आपल्या 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे लागले आहे. जोकोविचचा चौथ्या फेरीतील सामना सर्बियाच्या डिजेरीशी होणार आहे. सर्बियाच्या डिजेरीने दुसऱ्या फेरीतील सामन्यात गॅस्टोनचा 6-1, 6-2, 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत बुधवारी ग्रीसच्या सित्सिपसचा पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. स्वीसच्या स्ट्रिकरने सातव्या मानांकित सित्सिपसचा 7-5, 6-7(2-7), 6-7 (5-7), 7-6 (8-6), 6-3 अशा पाच सेट्समधील संघर्षपूर्ण लढतीत पराभव करत तिसरी फेरी गाठली. स्ट्रिकरच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा सर्वात मोठा विजय असून त्याने चार तासांच्या कालावधीत सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थिएमने कझाकस्तानच्या बुबलिकवर 6-3, 6-2, 6-4 अशी मात करत तिसरी फेरी गाठली.
कास्पर रुडला धक्का
अन्य एका सामन्यात कास्पर रुडला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. 2022 साली झालेल्या या स्पर्धेत डेन्मार्कच्या कास्पर रुडने उपविजेतेपद पटकावले होते. चीनच्या झँग झिझेनने पाचव्या मानांकित रुडचा 6-4, 5-7, 6-2, 0-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासामध्ये एटीपीच्या मानांकनातील पहिल्या पाच खेळाडूमधील टेनिसपटूला हरवणारा झँग हा चीनचा पहिला टेनिसपटू आहे. आता झँगचा तिसऱ्या फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या हिझीकेटाशी होणार आहे.
गॉफ, स्वायटेक विजयी
महिलांच्या खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने रशियाच्या अँड्रिव्हाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. या वर्षीच्या टेनिस हंगामात या स्पर्धेपूर्वी गॉफने वॉशिंग्टन आणि सिनसिनॅटी हार्डकोर्टवरील टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. गॉफने आपला दुसरा फेरीतील सामना 76 मिनिटात जिंकला. महिलांच्या विभागातील अन्य एका सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने ऑस्ट्रेलियाच्या स्पार्क प्लगचा 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत स्वायटेकने पहिल्या फेरीतील सामन्यात स्वीडनच्या रिबेका पीटरसनवर 6-0, 6-1 अशी सहज मात करत दुसरी फेरी गाठली होती. पुरुष दुहेरीच्या विभागात भारताचा रोहन बोपण्णा त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी विजयी सलामी दिली. सहावी मानांकित जोडी बोपण्णा आणि एब्डन यांनी जवळपास दोन तास चाललेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या ओकोनिल आणि व्ह्युकीक यांचा 6-4, 6-2 असा पराभव केला. बोपण्णा आणि एब्डन या जोडीने गेल्या जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.









