सोफिया केनिन, कॅस्पर रुड, थॉम्पसन, मिमोह यांचेही विजय, कोको गॉफ, व्हीनस विल्यम्स यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ लंडन
सलग पाचव्यांदा जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी दिली तर अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफ व वयस्कर खेळाडू व्हीनस विल्यम्स यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. याशिवाय कॅस्पर रुड, जॉर्डन थॉम्पसन यांनीही दुसरी फेरी गाठली तर मायकेल मिमोहने 11 व्या मानांकित फेलिक्स ऑगर अॅलियासिमेला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला. महिलांमध्ये सोफिया केनिन, एलिना स्विटोलिना, कॅरोलिन गार्सिया यांनी विजयाने प्रारंभ केला. जोकोविचने अर्जेन्टिनाच्या 68 व्या मानांकित पेड्रो कॅशिनवर 6-3, 6-3, 7-6 (7-4) अशी मात केली. 91 मिनिटे चाललेल्या या लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने 70 मिनिटे खेळ थांबला होता. सरकते छप्पर घातल्यानंतर सामना सुरू करण्यात आला.
जोकोविचने येथील स्पर्धा सात वेळा जिंकली असून त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनशी होईल. थॉम्पसनने धक्कादायक निकाल देताना ब्रँडन नाकाशिमाला 2-6, 2-6, 6-4, 7-6 (7-4), 6-3 असे चुरशीच्या लढतीत पराभूत केले. पुढील फेरीत तो जोकोविचविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार आहे. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या मायकेल मिमोहने 11 व्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अॅलियासिमेचा झुंजार लढतीत 7-6 (7-4), 7-6 (7-4), 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. चार तास सात मिनिटे ही झुंज रंगली होती. विम्बल्डनमध्ये मिमोहने मिळविलेला हा मुख्य ड्रॉमधील पहिलाच विजय आहे. याआधी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही मिमोहला लकी लुजर म्हणून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळाला होता आणि 13 व्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला पराभवाचा धक्का देत तिसऱ्या फेरीपर्यंत त्याने त्यावेळी मजल मारली होती. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत फॅबिओ फॉगनिनीकडून पराभूत झाल्यानंतर अॅलियासिमेचा हा पहिलाच सामना होता.

नॉर्वेच्या कॅस्पर रुडनेही दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या पात्रता फेरीतून आलेल्या लॉरेन्ट लोकोलीचा 6-1, 5-7, 6-4, 6-3 असा पराभव केला. गेल्या पाच ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी तीन स्पर्धांत कॅस्पर रुडने उपविजेतेपद मिळविले आहे. पण त्याला विम्बल्डनमध्ये लांबवर मजल मारता आलेली नाही. हा सामनाही पावसामुळे बंदिस्त छताखाली खेळविण्यात आला. त्याची पुढील लढत बिगरमानांकित वाईल्डकार्ड प्रवेशधारक लियाम ब्रॉडीशी होईल.
केनिनची गॉफवर मात
महिला एकेरीत सातव्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला पहिल्याच फेरीत पात्रता फेरीतून आलेल्या तिचीच देशवासी सोफिया केनिनकडून पराभवाचा धक्का बसला. केनिनने ही लढत 6-4, 4-6, 6-2 अशी जिंकली. केनिन सध्या जागतिक क्रमवारीत 128 व्या स्थानावर असून ती माजी ग्रँडस्लॅम चॅम्पियन आहे. मात्र येथे तिला पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवावा लागला आहे.
अन्य एका सामन्यात एलिना स्विटोलिनाने पाचवेळची विम्बल्डन
चॅम्पियन व्हीनस विल्यम्सचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. 43 वर्षीय व्हीनस एक फटका मारताना कोर्टवर घसरून पडल्याने ती जखमी झाली होती. सामना सुरू होण्याआधीच व्हीनसने उजव्या गुडघ्याला स्ट्रॅपिंग केले होते, त्यात या दुखापतीची भर पडली. याचा लाभ घेत स्विटोलिनाने विजय मिळविला. फ्रान्सचे आशास्थान असलेल्या पाचव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने अमेरिकेच्या केटी व्हॉलीनेट्सचा कडवा प्रतिकार 6-4, 6-3 असा मोडून काढत दुसरी फेरी गाठली. या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता.









