सफिउल्लिन, स्वायटेक, जेसिका पेगुला यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ लंडन
सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, इटलीचा यानिक सिनर, झेकची मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा, युक्रेनची एलिना स्विटोलिना यांनी येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर सातवा मानांकित आंद्रे रुबलेव्ह, रोमन सफिउल्लिन, चौथी मानांकित जेसिका पेगुला व अग्रमानांकित इगा स्वायटेक यांचे आव्हान संपुष्टात आले.

जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेत 46 व्या वेळी उपांत्य फेरी गाठताना रॉजर फेडररशी बरोबरी केली आणि रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचे पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्याने ही लढत 4-6, 6-1, 6-4, 6-3 अशी जिंकली. जोकोविच सलग पाचव्यांदा व एकूण आठव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या मार्गावर आहे. विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही 12 वी वेळ असून त्याचा हा 400 वा ग्रँडस्लॅम सामना होता. यापूर्वी रॉजर फेडरर व सेरेना विल्यम्स यांनीच हा पराक्रम केला होता. याशिवाय जोकोविचला आता एटीपी मानांकनात अग्रस्थानही मिळविण्याची संधी आहे.
अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात इटलीच्या आठव्या मानांकित यानिक सिनरने पहिल्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली असून त्याने रशियाच्या रोमन सफिउल्लिनची स्वप्नवत घोडदौड रोखताना त्याचा 6-4, 3-6, 6-2, 6-2 असा दोन तास 14 मिनिटांच्या खेळात पराभव केला. विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणारा 21 वर्षीय सिनर हा इटलीचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी निकोला पेत्रांजली (1960) व 2021 मध्ये अंतिम फेरी गाठणारा मॅटेव बेरेटिनी यांनी असा पराक्रम केला होता. या स्पर्धेत टॉप 50 मधील एकाही खेळाडूशी मुकाबला न करताच उपांत्य फेरी गाठणारा तो 1995 नंतरचा पहिला खेळाडू आहे. 1995 मध्ये बोरिस बेकर व पीट सांप्रास यांनी अशा प्रकारे या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

पेगुला, स्वायटेकला धक्का
महिला एकेरीत मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाने चौथ्या अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. तिने ही लढत 6-4, 2-6, 6-4 अशी जिंकताना निर्णायक सेटमध्ये शेवटचे सलग पाच गेम्स जिंकले. अन्य एका सामन्यात वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकचा धक्कादायक पराभव करीत शेवटच्या चारमध्ये प्रवेश मिळविला. ग्रँडस्लॅममध्ये कारकिर्दीत तिसऱ्यांदा तिने उपांत्य फेरी गाठली आहे. दोन तास 50 मिनिटांच्या खेळात तिने स्वायटेकवर 7-5, 6-7 (5-7), 6-2 अशी मात केली. तिची उपांत्य लढत झेकच्या व्होन्ड्रूसोव्हाशी होईल. स्विटोलिनाने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली असून तिने व्हीनस विल्यम्स, 28 व्या मानांकित एलिस मर्टेन्स, ऑस्ट्रेलियन माजी चॅम्पियन सोफिया केनिन, 19 व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्का यांना हरविले आहे. विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणारी ती तिसरी वाईल्डकार्ड प्रवेशधारक आहे. यापूर्वी जर्मनीची सबाईन लिसिस्की (2011) व चीनची झेंग जी (2008) यांनी हा मान मिळविला होता.
बॉक्स (बोपण्णा-एब्डन)
बोपण्णा-एब्डन उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी नेदरलँड्सचा डेव्हिड पेल व अमेरिकेचा रीस स्टॅल्डर यांच्यावर 7-5, 4-6, 7-6 (10-5) अशी मात केली. रोहन-एब्डन यांना या स्पर्धेत सहावे मानांकन मिळाले आहे. निर्णायक टायब्रेकर सेटमध्ये विजयी जोडीने तीनदा मॅचपॉईंट्स वाचवले. त्याआधी दुसऱ्या फेरीत रोहन-एब्ल्डन यांनी ब्रिटनच्या जेकब फियर्नली व जोहानस मंडे यांचा पराभव केला होता.









