ऑस्ट्रेलिया ओपन : कोको गॉफ, साबालेन्का, अँड्रीव्हा, अॅनिसिमोव्हा यांचीही आगेकूच
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, इटलीचा यानिक सिनर, जागतिक तिसरा मानांकित डॅनील मेदवेदेव्ह, आर्यना साबालेन्का, मिरा अँड्रीव्हा, कोको गॉफ व पुनरागमन करणारी अमांदा अॅनिसिमोव्हा यांनी विजय मिळवित ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
जोकोविचने अर्जेन्टिनाच्या टॉमस एचेव्हेरीचा 6-3, 6-3, 7-6 (7-2) असा विजय मिळवित आगेकूच केली. दहा वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचची चौथी फेरी गाठण्याची ही सोळावी वेळ असून त्याचा हा मेलबर्न पार्कवरील शंभरावा सामना होता. इटलीच्या यानिक सिनरनेही चौथी फेरी गाठताना 26 व्या मानांकित सेबॅस्टियन बाएझचा 6-0, 6-1, 6-3 असा फडशा पाडला. त्याची पुढील लढत 15 व्या मानांकित रशियाच्या कॅरेन खचानोव्ह किंवा झेकच्या टॉमस मॅसाच यापैकी एकाशी होईल.
जागतिक तिसऱ्या मानांकित रशियाच्या मेदवेदेव्हने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना देखील जोरदार मुसंडी शानदार विजय नोंदवला. मात्र यासाठी त्याला शुक्रवारी पहाटे 3.40 पर्यंत संघर्ष करावा लागला. दोनवेळचा उपविजेता असणाऱ्या मेदवेदेव्हने एमिल रूसुव्होरीवर 3-6, 6-7 (1-7), 6-4, 7-6 (7-1), 6-0 अशी मात केली. चार तास 20 मिनिटे ही झुंज रंगली होती. त्याची चौथ्या फेरीची लढत 27 व्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अॅलियासिमेशी होईल.
महिला एकेरीत विद्यमान विजेत्या साबालेन्काने सहज विजय मिळवित चौथ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. तिने 28 व्या मानांकित लेसिया त्सुरेन्कोचा 6-0, 6-0 असा ‘डबल बॅजेल’ धुव्वा उडविला. बेलारुसच्या या द्वितीय मानांकित खेळाडूने आतापर्यंत केवळ 6 गेम्स गमविले असून 52 मिनिटांत तिने हा सामना संपवला. अमेरिकेच्या बिगरमानांकित अमांदा अॅनिसिमोव्हाशी तिची पुढील लढत होईल. आठ महिन्यांच्या खंडानंतर पुनरागमन करणाऱ्या अॅनिसिमोव्हाने 13 व्या मानांकित ल्युडमिला सॅम्सोनोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव केला.
किशोरवयीन टेनिसपटू मिरा अँड्रीव्हाने स्वप्नवत घोडदौड पुढे चालू ठेवत चौथी फेरी गाठताना फ्रान्सच्या डायने पॅरीचा 1-6, 6-1, 7-6 (10-5) असा पराभव केला. तिची पुढील लढत बार्बरा क्रेसिकोव्हा किंवा स्टॉर्म हंटर यापैकी एकीशी होईल. अमेरिकेच्या कोको गॉफनेही चौथ्या फेरीत स्थान मिळविले असून आपल्याच देशाच्या अॅलीसिया पार्क्सचा 6-0, 6-2 असा पराभव केला. तिचा पुढील सामना मॅग्डालेना फ्रेच किंवा अॅनास्तेशिया झाखारोव्हा यापैकी एकीशी होईल.
बोपण्णा-एब्डन तिसऱ्या फेरीत
पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व मॅथ्यू एब्डन या दुसऱ्या मानांकित जोडीने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन व एडवर्ड विंटर यांचा 6-2, 6-4 अस पराभव करीत तिसरी फेरी गाठली. श्रीराम बालाजी व रोमानियाचा व्हिक्टर कॉर्निया योंनी इटलीच्या मॅटेव अरनाल्डी व आंद्रेया पेलेग्रिनो यांच्यावर 6-3, 6-4 अशी मात करून दुहेरीची दुसरी फेरी गाठली.