वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील चौथ्या आणि शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. दरम्यान या स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोव्हिच आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील विक्रमी 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद तसेच या स्पर्धेतील चौथे अजिंक्यपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याला यावेळी स्पेनचा नवोदित कार्लोस अॅलकॅरेझ तसेच मेदवेदेव व अन्य कांही सिडेड खेळाडूंच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागेल. जोकोव्हिचने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत स्पेनचा 20 वर्षीय अॅलकॅरेझ हा नवा विजेता ठरला. जोकोव्हिचला अंतिम सामन्यात अॅलकॅरेझने पराभूत केले होते. तब्बल दोन वर्षांनंतर जोकोव्हिचचे अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन होत आहे. रशियाचा मेदवेदेव, रूबलेव्ह, जर्मनीचा व्हेरेव्ह, ग्रीसचा सित्सपास, नार्वेचा रूड यांच्याकडूनही दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.