गार्सिया, रुने, डी मिनॉर, झेंग शुई यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मेलबॉर्न
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात सर्वियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोव्हिच तसेच रशियाचा आंद्रे रुबलेव्ह, महिला एकेरीत बेलारुसच्या आर्याना सबालिनेका, व्हिक्टोरिया अझारेंका, पोलंडची लिनेटी, क्रोएशियाची व्हेकीक तसेच झेकची कॅरोलिना प्लिसकोव्हा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. फ्रान्सची गार्सिया, बेनसिक, झेंग शुई, डेन्मार्कचा रुने, चीनची झु लीन, ऑस्ट्रेलियाचा डी. मिनॉर यांचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या सोमवारी झालेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोव्हिकने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरचा 6-2, 6-1, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियन भुमीवरील जोकोव्हिचचा हा सलग 38 वा विजय आहे. जोकोव्हिच आता या स्पर्धेचे दहाव्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात रशियाच्या रुबलेव्हने डेन्मार्कच्या होल्गेरच्या रुनेचे आव्हान 6-3, 3-6, 6-3, 4-6, 7-6 (11-9) अशा पाच सेट्समधील लढतीत संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सोमवारी झालेल्या सामन्यात बेलारुसच्या सबालिनेकाने 12 व्या मानांकित बेलिंडा बेनसिकचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 87 मिनिटे चालला होता. दुसऱया एका सामन्यात क्रोएशियाच्या डोना व्हेकीकने झेकच्या लिंडा प्रुहव्हर्टोव्हाचा 6-2, 1-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 2 तास 7 मिनिटे चालला होता. व्हेकीकने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत दुसऱयांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यत मजल मारली आहे.
पोलंडच्या मॅगेडा लिनेटीने फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियाला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. लिनेटीने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना सोमवारी झालेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात गार्सियाचा 7-6 (7-3), 6-4 अशा सेट्समध्ये फडशा पाडला. गार्सिया आणि झेकची प्लिसकोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. झेकच्या प्लिसकोव्हाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चीनच्या झेंग शुईचा 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात 30 व्या मानांकित प्लिसकोव्हाने 12 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. प्लिकोव्हाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आत्तापर्यंत 11 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर सोमवारच्या सामन्यात तिने केवळ 55 मिनिटात शुईचा फडशा पाडला. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना झालेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात चीनच्या झु लीनचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. अझारेंकाने यापूर्वी दोन वेळेला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. आता अझारेंका आणि अमेरिकेची पेगुला यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. 33 वर्षीय अझारेंकाला या सामन्यात विजयासाठी 2 तास 40 मिनिटे झगडावे लागले.









