व्हेरेव, होल्गर रुने, कॉलिन्स यांचे स्पर्धेतील आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/लंडन
2024 च्या विम्बल्डन ग्रासकोर्ट ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर फ्रिजने जर्मनीच्या व्हेरेवचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सर्बियाच्या जोकोव्हिचने रुनेवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांच्या विभागात ईलिना रायबाकिना, स्विटोलिना, क्रेसीकोव्हा, ओस्टापेंको यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
पुरूष एकेरीच्या झालेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिजने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा 4-6, 6-7(4-7), 6-4, 7-6(7-3), 6-3 अशा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना साडेतीन तास चालला होता. या लढतीत व्हेरेवने पहिले सलग दोन सेटस् जिंकून आघाडी घेतली होती. पण त्यानंतर फ्रिजने भेदक वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळावर अधिक भर देत व्हेरेवला नमविले. यावेळी विम्बल्डन स्पर्धेत पुरूष एकेरीत अमेरिकेच्या दोन टेनिसपटूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम इ.स. 2000 नंतर पहिल्यांदाच केला आहे. फ्रिज आणि टॉमी पॉल यांनी या अमेरिकन टेनिसपटूंनी आतापर्यंत दर्जेदार खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स डी मिनॉर आणि आतापर्यंत सातवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा सर्बियाचा जोकोव्हिच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. सर्बियाच्या जोकोव्हिचने चौथ्या फेरीतील सामन्यात 15 व्या मानांकित होल्गेर रुनेचा 6-3, 6-4, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये दोन तासांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने आर्थर फिल्सचा 6-2, 6-4,4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
महिलांच्या विभागात जस्मीन पाओलिनीने गिव्होनी पेरिकार्डचा 4-6, 6-3, 6-3, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या निषेधार्थ रायबाकिना आणि स्विटोलिना यांनी काळीपट्टी दंडाला बांधून चौथ्या फेरीच्या सामन्यासाठी कोर्टमध्ये प्रवेश केला. रायबाकिना आणि स्विटोलिना यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. ओस्टापेंको आणि क्रेसिकोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल. अॅना कॅलिनस्काय मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या फेरीतील सामना अर्धवट सोडल्यामुळे रायबाकिनाला उपांत्यपूर्व फेरीत चाल मिळाली. स्विटोलिनाने झिनयुचा 6-2, 6-1, क्रेसिकोव्हाने डॅनिली कॉलिन्सचा 7-5, 6-3, ओस्टापेंकोने पुतीनसेव्हाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. पुतीनसेव्हाने या स्पर्धेत तिसऱ्या फेरीतील लढतीत पोलंडच्या टॉपसिडेड स्वायटेकला पराभवचा धक्का दिला होता.