वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
येथे सुरु असेलेल्या इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचला झेन्डस्कल्पकडून पराभवाचा धक्का मिळाला. तर स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात झेन्डस्कल्पने जोकोविचचा 6-2, 3-6, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये जर्मनीच्या व्हेरेव बरोबरच्या उपांत्य सामन्यातून स्नायू दुखापतीमुळे जोकोविचने माघार घेतली होती. दुसऱ्या एका सामन्यात स्पेनच्या माजी टॉप सिडेड अल्कारेझने फ्रान्सच्या क्वेनटीन हॅलेसचा 6-4, 6-2 असा फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात अल्कारेझने 7 बिनतोड सर्व्हिसची नोंद करत 67 मिनिटात आपला विजय नोंदविला. अमेरिकेच्या टेलर क्रिझने इटलीच्या गिगानेटीचा 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या मॅडिसन किझने रशियाच्या पोटापोव्हाचा 6-3, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मॅडिसन किझने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा गेल्या जानेवारीत जिंकली होती. किझने हा सामना 63 मिनिटात जिंकल. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या कोको गॉफ आणि पुरुषांच्या विभागात टेलर क्रिझने आपले विजय नोंदविले. अमेरिकेच्या कोको गॉफने जपानच्या मोयुका उचिजेमाचा 6-3, 3-6, 7-6 (7-4) असा पराभव केला.









