वृत्तसंस्था/ रोम
स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कारेझची 12 सामन्यांची विजयी मालिका येथे सुरू असलेल्या इटालियन ओपन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत खंडित झाली असून हंगेरीच्या 135 व्या मानांकित फॅबियन मॅरोझसनकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला तर नोव्हॅक जोकोविचने उपांत्यपूर्व फेरी गाठताना ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीचा पराभव केला.
जोकोविचने नोरीवर 6-3, 6-4 अशी मात करीत सातव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पात्रता फेरीतून आलेल्या मॅरोझसनने अल्कारेझवर 6-3, 7-6 (7-4) अशी मात करीत आगूकच केली. अल्कारेझ बार्सिलोना व माद्रिद येथे सलग दोन क्ले कोर्ट स्पर्धा जिंकल्या आणि येथील स्पर्धेतील पहिला सामना जिंकून त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली. रोममध्ये खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. मॅरोझसनची पुढील लढत बोर्ना कोरिकशी होईल. कोरिकने रॉबर्टो कार्बालेस बाएनाचा 7-6 (7-3), 6-1 असा पराभव केला. याशिवाय जर्मनीच्या यानिक हन्फमनने मार्को सेक्चीनाटोवर 6-4, 4-6, 6-3 अशी मात केली.









