वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारातील पुरूष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने त्याचा पराभव करीत तिसरी फेरी गाठली.
स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने 6-1, 6-4 असा पराभव केला. पहिला सेट आरामात जिंकल्यानंतर जोकोविचला दुसऱ्या सेटमध्ये नदालकडून थोडाफार प्रतिकार झाला. पहिल्या फेरीतील सामन्यात नदालने फ्युकसोव्हिक्सचा 6-1, 4-6, 6-4 असा पराभव केला. नदालने आपल्या वैयिक्तक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 14 वेळा फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्याने या सलामीच्या सामन्यापूर्वी येथील टेनिस शौकिनांनी नदालचे जोरदार स्वागत केले. नदालने आतापर्यंत 22 ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत त्याने स्पेनला सुवर्णपदक तर 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने पुरूष दुहेरीत स्पेनला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.









