वृत्तसंस्था/ लंडन
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सोमवार दि. 3 जुलैपासून अखिल इंग्लंड टेनिस फेडरेशनच्या ग्रासकोर्टवर प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यावर्षी स्पर्धा आयोजकांनी सदर स्पर्धेच्या बक्षीसामध्ये यापूर्वी दुप्पट वाढ केली आहे. सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविचने आतापर्यंत ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे. मात्र यावेळी त्याला जेतेपदासाठी अव्वल नवोदित टेनिसपटूंशी मुकाबला करावा लागणार आहे. जोकोविचचे लक्ष्य आता या स्पर्धेच्या आठव्या जेतेपदावर तसेच 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर राहिल.
स्वीसचा माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धेत वैयक्तिक विक्रम केला असून तो अद्याप अबाधित आहे. फेडररने आपल्या टेनिस कारकीर्दीत आठवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी जोकोविचला यावेळी जेतेपदासाठी अधिक झगडावे लागेल. 36 वर्षीय जोकोविचने गेल्या मे महिन्यात झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून स्पेनच्या राफेल नदालच्या 23 ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जोकोविचने 2023 च्या टेनिस हंगामात मेलबोर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम दहावे विजेतेपद तसेच मे महिन्यात झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. आता तो या चालू वर्षाच्या हंगामातील विम्बल्डन आणि त्यानंतर म्हणजे सप्टेंबरात होणाऱ्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासाठी झगडत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी टेनिसपटू रॉड लेव्हरने 1969 साली चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. या पराक्रमाची बरोबरी साधण्यासाठी जोकोविचला चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील उर्वरित दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकाव्या लागतील. जोकोविचने गेल्या चार विम्बल्डन स्पर्धेत अजिंक्यपदे मिळवली आहेत. तसेच 2013 पासून तो या स्पर्धेत अंतिम फेरी गमवलेला नाही.
स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझ हा यावेळी जोकोविचचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाईल. ग्रासकोर्टवर अॅलकॅरेझची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली आहे. जोकोविच आणि अॅलकॅरेझ यांच्यातच जेतेपदासाठी लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2013 साली झालेल्या या स्पर्धेत जोकोविचला ब्रिटनच्या अँडी मरेकडून पराभव पत्करावा लागला होता. स्पेनच्या अॅलकॅरेझने 2022 च्या विम्बल्डन स्पर्धेत शेवटच्या 16 खेळाडूत प्रवेश मिळवला होता पण त्याला सिनेरकडून हार पत्करावी लागली होती. 2022 च्या विम्बल्डन स्पर्धेत मॉस्कोत जन्मलेली कझाकस्तानची इलेना रिबाकिना ही महिला विभागातील विजेती आहे. महिला विभागात पोलंडच्या 22 वर्षीय इगा स्वायटेकला टॉप सिडींग देण्यात आले आहे. इगा स्वायटेक, साबालेनेका, रिबाकिना, जेबॉर यांच्यात जेतेपदासाठी चुरस राहिल. गेल्या वर्षी साबालेनेकाला या स्पर्धेत बंदी घालण्यात आली होती. ट्युनेशियाच्या जेबॉरने 2021 साली बर्मिंगहॅममधील ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा जिकली होती. अमेरिकेची अनुभवी व्हिनस विलियम्स तसेच झेकची पेत्रा क्विटोव्हा यांच्याकडून अनपेक्षित निकाल मिळू शकतील.